आश्वी खुर्द येथील कांचनची दिव्यांगावर मात ; ‘डिएमएलटी कोर्स’ झाली उत्तीर्ण!
◻️ नोकरीसाठी सुरु आहे तिची धडपड ; दिव्यांग कुटुंबाचा व्हाचय तिला आधार
◻️ कुटुंबातील तिघांची उंची अवघी अडीज फुट ; पुढील पिढी दिव्यांग होणार नाही?
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील राजेंद्र विठ्ठल शिंदे यांच्यासह त्याची पत्नी, एक मुलगी असे दिव्यांग कुटुंब राहत आहे. या कुटुंबातील तिघांची उंची अवघी अडीज फुट आहे. त्यामुळे सर्व सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवनमान जगण्यात अडथळे येत असले तरी, याचं कुटुंबातील मुलगी कांचन राजेंद्र शिंदे हिने दिव्यांगावर मात करत बारावी नंतर ’डिएमएलटी कोर्स’ पुर्ण करुन आपल्या दिव्यांग कुटुंबाला नोकरीच्या माध्यमातून हातभार लावण्याची तयारी सुरू केली आहे.
दिव्यांग कांचनचे वडील राजेंद्र विठ्ठल शिंदे हे सुध्दा दिव्यांग असून वयोमानानुसार काम करणे आता कठीण होतं चालले आहे. आई ही दिव्यांग असल्याने तीही सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणे वावरु शकत नसल्याने घरीचं असते. लहान भावाचे वय अवघे पाच वर्ष असल्याने त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे कुटुंबातील वडील राजेंद्र, आई सुमन व लहान भाऊ विहर्ष यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची दिव्यांग कांचनची इच्छा आहे.
काचंनने दिव्यांग असूनही सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे १२ वी पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेतल्यानंतर संगमनेर येथील महाविद्यालयातून ‘डिएमएलटी’ हा दोन वर्षाचा कोर्स पुर्ण केला आहे. सध्या कांचन ही एका खाजगी ठिकाणी काम करत असून आपल्या कुटुंबाने ही सर्वसामान्य लोकांसारखे आयुष्य जगावे ही तिची इच्छा आहे. त्यामुळे चांगली नोकरी शोधण्याची तिची धडपड सुरू असून तिला लवकरात लवकर यश मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिव्यांग असूनही स्वकष्टातून आतापर्यंत संसाराचा गाडा सुरळीत ठेवला असून स्वता:चे घर देखील बांधले आहे. यासाठी गावातील विविध क्षेत्रातील नामवंत नागरीकांनी वेळोवेळी मदत केल्यामुळे हा प्रवास शक्य झाला. आता मला माझ्या दिव्यांग मुलीला स्वता:च्या पायावर उभे झालेले पाहायचे आहे. अशा भावना वडील राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
पुढील पिढी दिव्यांग होणार नाही..
दिव्यांग शिंदे कुटुंबात जन्माला आलेल्या विहर्ष हा मुलगा सर्व सामान्य जन्माला आला आहे. त्याची उंची इतरांप्रमाणे सर्वसामान्य राहणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे शिंदे कुटुंबांने सांगितले. त्यामुळे विहर्ष च्या रुपाने शिंदे कुटुंबातील पुढची पिढी ही दिव्यांग होणार नसल्याने त्याने भारतीय सैन्य दलात जाऊन देशसेवा करावी, अशी त्याच्या वडीलांची इच्छा आहे.
***अधिक माहितीसाठी कांचनचे वडील राजेंद्र विठ्ठल शिंदे यांना तुम्ही संपर्क करु शकता - 9665262224