शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार ठाकरे गटाचाच होणार !
◻️ खा. लोखंडे यांचा पाडाव करण्यासाठी उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार निवडून आणणार - शिवसैनिक
◻️ जुने मतभेद विसरून शिवसैनिक एकत्र
संगमनेर LIVE | शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना २०१४ साली शिवसेना स्टाईल जाब विचारत संगमनेर येथील तत्कालीन शहरप्रमुख अमर कतारी, शिवसैनिक भाऊसाहेब हासे हे दोन पदाधिकारी प्रसिद्धीत आले होते.
भाऊसाहेब वाकचौरे व कतारी, हासे यांच्यातील वैमनस्य हे शिगेला पोहचले होते. गेले नऊ ते दहा वर्षे भाऊसाहेब वाकचौरे प्रकरणात न्यायालयीन लढा देखिल हे शिवसैनिक देत होते. त्याचमुळे वाकचौरे यांच्या शिवसेनेत (ठाकरे) घरवापसीला त्यांनी टोकाचा विरोध करत माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता.
नंतर मात्र वाकचौरे यांच्या मर्जीतील पदाधिकारी नियुक्त करत जिल्हा स्तरावर शिवसेनेत मोठे फेरबदल झाले व वाकचौरे हे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या साथीने मतदारसंघात आढावा बैठका घेतांना दिसून येत आहे. नुकतेच अकोल्याहुन संगमनेर कडे येणाऱ्या शिवसेना (ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांचा ताफा अकोले नाका, जाजू पेट्रोल पंप येथे थांबला व ह्या वादावर पडदा पडत असल्याचे पाहून शिवसैनिक देखील सुखावले.
माजी शहरप्रमुख अमर कतारी व माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी माजी खासदार वाकचौरे तसेच जिल्हाप्रमुख खेवरे यांचा शेकडो शिवसैनिक समर्थकांच्या उपस्थितीत सत्कार करत स्वागत केले. याबाबत विचारले असता अमर कतारी यांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या ते म्हणाले, शिवसेनेत मातोश्रीचा आदेश अंतिम मानला जातो, ठाकरेनिष्ठ शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर असून शिर्डी लोकसभेत ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणत्याही वाटाघाटी कराव्या लागल्या तरी त्या वरीष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वात त्या करायला शिवसैनिक म्हणून मी बांधील आहे.
शिर्डी लोकसभेत पक्षाचे संघटनात्मक मोठे काम झालेले आहे, पक्षाला व महाविकास आघाडीला पोषक वातावरण तयार झालेले आहे. भाऊसाहेब वाकचौरे, बबनराव घोलप किंवा उत्कर्षा रुपवते, घनदाट यांचे नावे या आधी चर्चेत होती. ठाकरें सोबत गद्दारी करणाऱ्या लोखंडे यांचा पाडाव करण्यासाठी पक्षाकडून पक्षप्रमुख उद्धवसाहेब देतील तो उमेदवार निवडून आणण्यात सर्वतोपरी योगदान देण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांना एकत्र घेऊन या पुढे अधिक जोमाने काम करणार असल्याचे देखिल अमर कतारी, भाऊसाहेब हासे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहर प्रमुख गोविंद नागरे व महिला आघाडीचे पदाधिकारी यांनी सांगितले.