स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांचे जीवन कार्य सदैव प्रेरणादायी - मधुकर भावे
◻️ गांधींचा विचार हाच शाश्वत विचार - माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात
◻️ सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त तालुक्यातील ज्येष्ठांचा सन्मान
संगमनेर LIVE | सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह शाल पुष्पहार देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी काढले असून गांधींचा विचार हाच शाश्वत विचार असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे जयंती शताब्दी निमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, आमदार सत्यजित तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, बाबासाहेब ओहोळ, रणजीत सिंह देशमुख, बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, लहानभाऊ गुंजाळ, रामहरी कातोरे, सौ. शरयूताई देशमुख, सुधाकर जोशी, शंकर खेमनर, संपतराव डोंगरे, व्हा. चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मधुकर भावे म्हणाले की, काही विघातक शक्तींनी गांधीजींना मारले. मात्र त्यांचे विचार कधी मारता येणार नाही .जगभरातील ६०० विद्यापीठामधून गांधी विचार शिकवला जातो. गांधी नेहरू हा देशाच्या विकासाचा विचार आहे. तो कोणीही पुसू शकणार नाही. चंद्रयानाने पहिले पाऊल चंद्रावर ठेवले तेव्हा इस्रो नेहरूंना धन्यवाद दिले. राम हा खरा गांधीजींचा आहे.
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विचार व पक्षनिष्ठा जपून काम केले आहे. ८५ पासून विधान मंडळात असताना एकही डाग या नेतृत्वावर पडला नाही. विचारावर उभा राहणारा माणूस कधीही अयशस्वी होत नाही. सर्वधर्म समभाव व पुरोगामी विचार जपणारे बाळासाहेब थोरात यांनी वडील भाऊसाहेब थोरात यांचे पांग फेडले असल्याचे गौरव उद्गारही त्यांनी काढले.
माजी मंत्री आमदार थोरात म्हणाले की, तालुक्याच्या विकासात स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज आपण आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी तालुक्याच्या विकासाला वेळोवेळी साथ दिली. भाऊसाहेब थोरात आणि सहकारातून तालुक्यात समृद्धी निर्माण केली तर डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केंद्रात पंधरा वर्षे कृषी मंत्री पद अत्यंत सक्षमपणे सांभाळले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. इतका विश्वास नेहरूजींचा त्यांच्यावर होता. देशात हरितक्रांती निर्माण करण्यात डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा मोठा वाटा राहिला. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे कायम ऋण व्यक्त आपण केले आहे. तालुक्याच्या विकासात मागील पिढीने मोठे योगदान दिले. त्यांचा येथे सन्मान होत आहे. आज अनेक जण काळाच्या ओघात नाहीत. मात्र या सर्वांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
राज्यघटना आणि गांधीजींचा विचार हाच शाश्वत राहणार असून आपल्या सर्वांना तो जपायचा आहे. अडचणी खूप आहेत. मात्र अडचणीत आपण लढतो याची इतिहास नोंद घेईल असेही ते म्हणाले.
यावेळी तालुक्यातील विविध ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांचा सन्मान आमदार थोरात यांनी केला यावेळी अनेकांना गहिवरून आले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाबा ओहोळ यांनी आभार मानले.
जयंती महोत्सवातील सर्व कार्यक्रम ठरले लक्षवेधी..
जयंती महोत्सवानिमित्त झालेला पुरस्कार वितरण सोहळा यासाठी राज्यभरातून आलेले विविध पक्षांचे मान्यवर सिंधुदुर्ग ते गोंदिया या सर्व जिल्ह्यांमधून शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. हे राज्यातील जनतेचे प्रेम आहे. याचबरोबर आदेश बांदेकरांचा खेळ मांडीयेला, जावेद अलीचा लाईव्ह कॉन्सर्ट, विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन हे कार्यक्रमही अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रचंड मोठ्या उत्साहाने आणि उपस्थितीने संपन्न झाले असल्याचेही आमदार थोरात यांनी सांगितले
गावोगावी अभिवादन..
१२ जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात मोठ्या उत्साहाने साजरा होत असून संगमनेर तालुक्यातील १७१ गावांमध्ये विविध सहकारी संस्था ग्रामपंचायत मधून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक गावांमधून प्रभात फेरी काढण्यात आली होती.