नाशिककरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेमाचा वर्षाव!

संगमनेर Live
0
नाशिककरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेमाचा वर्षाव!

◻️ ‘रोड शो'च्या माध्यमातून अभिवादन स्वीकारत पंतप्रधान यांनी जिंकली नाशिककरांची मने


संगमनेर LIVE (नाशिक) | राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत 'भारत माता की जय'चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला. पंतप्रधान मोदी यांच्या या 'रोड शो'ची जादू नाशिककरांवर झाल्याचं चित्र आज सगळीकडे पाहायला मिळाले.

सकाळी ठीक १०.३० वाजता पंतप्रधान मोदी यांचे निलगिरी बाग हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यानंतर हॉटेल मिर्ची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून त्यांच्या 'रोड शो'ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील रोड शोमध्ये सहभागी झाले होते.
नाशिकच्या युवा वर्गाने केलेली गर्दी, महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद, दुतर्फा सजलेले रस्ते अशा वातावरणात तपोवनाच्या दिशेने निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी या आपुलकी आणि प्रेमाने केलेल्या स्वागताचा अनुभव आला. उपस्थितांच्या दिशेने हात उंचावत तसेच उपस्थितांना अभिवादन करत पंतप्रधान मोदी यांचा ताफा तपोवन कडे निघाला.

लेझिम पथक, ढोलपथक, पारंपरिक वाद्ये यांच्या साहाय्याने आणि नृत्य करत विविध पथके या मार्गावर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करत होती. हॉटेल मिर्ची ते तपोवन पर्यंतचा संपूर्ण रस्त्यावर उत्साह, चैतन्य, आनंदाचे वातावरण होते. हातात तिरंगा घेऊन  युवकांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या युवा मंडळांनी मल्लखांब प्रात्यक्षिके, पारंपरिक कलांचा आविष्कार यावेळी सादर केला. 

दरम्यान त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बाल वारकऱ्यांच्या समावेश असलेल्या दिंडीने विशेष लक्ष वेधले. आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य, पंजाबी नृत्य, अशा विविध पद्धतीने आणि विविध रंगी वेशभूषा करून नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !