बापू तेरे रास्ते भावगीतांनी परिसर भक्तीमय ; भजनांनी मानवंदना
◻️ प्रेरणादिनानिमित्त महात्मा गांधींच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर LIVE | सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार सांगणारा बापू तेरे रास्ते या भावगीतांच्या कार्यक्रमामधून आदरांजली वाहण्यात आली असून वैष्णव जनते, कानडा राजा पंढरीचा, मोगरा फुलला, मिले सुर मेरा तुम्हारा अशा विविध गीतांमधून परिसर भक्तीरसात न्हावून निघाला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त बापू तेरे रास्ते हा भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, बाबा ओहोळ, रणजीतसिंग देशमुख, बाजीराव पा. खेमनर, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी, संतोष हासे, रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, शंकर खेमनर, नवनाथ आरगडे, आर. बी. राहणे, प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नागपूर येथील सुर संगम यांच्यावतीने बापू तेरे रास्ते हा भक्तिमय गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात तू प्यार का सागर है या गांधीजींच्या गीताने झाली. तर सौ. सुरभीताई ढोमणे यांनी संत ज्ञानेश्वरांची मोगरा फुलला, मोगरा फुलला ही अभंग रचना गायली. त्यानंतर गायक सारंग जोशी यांनी कानडा राजा पंढरीचा हे गीत सादर केले.
‘वैष्णव जन’ हे गीत सर्वांनी सामूहिक गायले. भक्ती पूर्ण टाळ्यांच्या साथीने रघुपती राघव राजाराम हे भावगीत उपस्थित सर्वांनी एक सूर एक तालात गायले. यानंतर दे दी हमे आजादी बिना खडग,बिना ढाल, हे भावगीत सादर झाले. महात्मा गांधीजींचे विचार या भावगीतांमध्ये निवेदक डॉ. मनोज साल्पेकर यांनी अधिक रंग भरले.
भारत चीन युद्धाचा प्रसंग त्यांनी सांगताना सर्वांच्या अंगावर शहारे आले. यावेळी गायलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणले. अत्यंत भक्तिमय आणि भावनिक वातावरणात हा भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला. देशाची एकात्मता आणि अखंडता दाखवणारा मिले सुर, मेरा तुम्हारा हे गीत म्हणत सर्वांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता ही व्यक्त केली.
यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, तालुक्यातील जेष्ठ नागरिक, महिला, युवक, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वर्गीय भाऊसाहेबांचे तत्वनिष्ठा जपत आ. थोरात यांनी वडिलांचे पांग फेडले - भावे
विचारांवर उभा असलेल्या माणूस कधीही यशस्वी होत नाही आमदार बाळासाहेब थोरात हे ८५ पासून विधानभवनात प्रतिनिधित्व करत असून अठरा वर्ष मंत्री असूनही एकही ओरखडा त्यांच्यावर नाही. सत्ता येते जाते. बाळासाहेब जनकल्याणाचा वारसा आपण हाती घेतला असून महाराष्ट्राचे भवितव्य आपल्या हाती आहे. आपले भवितव्य उज्वल असून आपण आपल्या कार्यशैलीतून वडील भाऊसाहेब थोरात यांचे पांग फेडले असल्याचे भावनिक उद्गार ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी काढले यावेळी सर्वांचे हृदय भरून आले.