भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संगमनेर Live
0
भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

◻️ ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

संगमनेर LIVE (मुंबई) | भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेलं सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचं अनोखं वरदान म्हणता येईल, अशी एक तेजस्वी गान प्रभा आज निमाली आहे, अशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भारतीय संगीत क्षेत्राचे क्षितीज उजळवून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश करावा लागेल. शास्त्रीय संगीतातील त्यांचे योगदान उच्चकोटीचे राहीले आहे. संगीतातील विविध प्रवाहांना सामावून घेऊन, हे क्षेत्र त्यांनी समृद्ध केलं. आपल्या अलौकिक प्रतिभेने त्यांनी गायनातील मानदंड प्रस्थापित केले. त्यांचं गाणं स्वर्गीय आणि मंत्रमुग्ध करणारं होतं तसचं ते आपल्या संगीत क्षेत्राचं देखणेपण आणि नजाकत प्रकट करणारं होतं. त्यांनी भारतीय संगीताचं हे रुप आपल्या प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्वातून देश-विदेशातही पोहचवलं. आपल्या प्रसन्न, वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरांनी त्या अजरामरच आहेत. 

आवाजाच्या रुपात त्या आपल्या अवतीभवतीच राहतील. संगीत क्षेत्राला मात्र त्यांची निश्चितच पोकळी जाणवेल. ही भारतीय संगीत क्षेत्राची आणि रसिकांसाठी मोठी हानी आहे. भारतीय संगीतामध्ये होणारे विविध बदल सहजपणे आत्मसात करीत संगीत क्षितिजावर अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्वरयोगिनीच्या रुपातील एक तेजस्वी तारा निखळला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान डॉ. अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !