शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा कॉग्रेसच्या वाट्याला - डॉ. राजू वाघमारे
◻️ कॉग्रेसकडून लोकसभेच्या निवडणूका आधी मतदारसंघात चाचपणीला सुरवात
संगमनेर LIVE | शिर्डी लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील विकास कामाचे श्रेय हे कॉग्रेस पक्षाचे आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेले ‘खोके सरकार’ सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. राज्यातील ४८ पैकी ४२ जागावर ‘इंडिया आघाडी’ला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो कॉग्रेसच्या वाट्याला यावा यासाठी कार्यकर्ता म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. असे कॉग्रेस प्रवक्ते व पक्षाचे सर चिटणीस डॉ. राजू वाघमारे यांनी आश्वी येथे पत्रकारशी संवाद साधताना म्हटले आहे.
कॉग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी नुकतीचं आश्वी (ता. संगमनेर) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी रिपाईचे (गवई गट) जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे, आश्वी बुद्रकचे सरपंच नामदेव शिंदे, बबन शिंदे तसेच परिसरातून भेटीसाठी आलेले कॉग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजू वाघमारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिर्डी लोकसभा मतदारसंघावर कॉग्रेस दावा सांगणार असल्याचे सांगितले. तर ‘आपण कॉग्रेस पक्षाचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार आहात का?' यावर मात्र कॉग्रेस पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे वाघमारे यांनी म्हणत पत्रकारांच्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला असला तरी, लोकसभेसाठी ते इच्छूक असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सांगुन गेले आहेत.
यावेळी डॉ. राजू वाघमारे यांनी भाजपच्या केंद्र व राज्यातील सरकारच्या ध्येय धोरणावर कडाडून टीका करताना शंभर स्मार्ट सिटी, उज्ज्वला गॅस, शौचालय योजना अशा विविध योजना फेल गेल्याचे सांगून कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणात देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे. तसेच प्रभु श्रीराम यांच्या नावाचा वापर भाजप राजकारणासाठी करत असल्याचा आरोप डॉ. वाघमारे यांनी करत हिंदू धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या शंकराचार्य यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे खरे हिंदू आहेत का? अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली.
दरम्यान यावेळी उपस्थित कॉग्रेस कार्यकर्त्याशी संवाद साधून त्यांच्या देखील भावना डॉ. राजू वाघमारे यांनी जाणून घेतल्या आहेत.