प्रवरा उजव्या कालव्यात तोल जावून पडलेला २८ वर्षीय तरुण गेला वाहून
◻️ ओझर खुर्द येथील घटना ; २४ तासांपेक्षा अधिक काळापासून शोध मोहीम सुरू
संगमनेर LIVE (आश्वी) | प्रवरा उजव्या कालव्यात तोल जावून पडल्यामुळे सोन्या मच्छिंद्र मोरे (वय - २८) हा तरुण वाहुन गेला असल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी उजेडात आली आहे. २४ तास उलटूनही या तरुणाचा थांगपत्ता आद्यप लागलेला नाही.
सोन्या मच्छिंद्र मोरे हा तरुण शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गावातुन घराकडे चालला होता. यावेळी ओझर खुर्द (ता. संगमनेर) प्रवरा उजव्या कालव्या वरील पुलावरुन त्याचा तोल गेला व तो थेट काठोकाठ पाण्याने भरलेल्या वाहत्या कालव्यात पडला. कालव्यातील पाण्याचा प्रवाह हा जोरात असल्याने तो वाहुन गेला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच ओझर खुर्द ग्रामपंचायतचे उपसरपंच दगडु शेपाळ, सुंदरनाथ शेजुळ, सोमनाथ बर्डे, बाळासाहेब भागवत, सागर शिंदे, प्रविण शेपाळ, युवराज बर्डे, कैलास कदम, गोविंद साबळे, संपतराव शिंदे आदिसह गावातील तुरुण मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले व काही तरुणांनी पाण्यात उतरून शोध मोहीम सुरु केली. शनिवारी रात्री उशीरापर्यंत व रविवारी सकाळ पासुनचं शोध मोहीम सुरु केली तरी, सोन्याचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे दुपारनंतर प्रवरा उजव्या कालव्याचे पाणी कमी करुन शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.
दरम्यान बेपत्ता सोन्या मोरे यांच्या शोध मोहीमेवर नायब तहसीलदार पारखे, तलाठी शेलार, पोलीस पाटील सुभाष खेमनर व आंधळे हे लक्ष ठेवून आहेत. बेपत्ता सोन्या मोरे हा विवाहित असुन त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
सुनील उर्फ सोन्या हा कालव्यात पडल्याची प्राथमिक माहिती असली तरी, तो उत्तम पोहणारा असल्याचे त्याला ओळखणाऱ्या व्यक्तीचे म्हणने आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये देखील त्याची शोधमोहीम सुरू आहे. “तो पाण्यात पडला व वाहून गेला ही अफवा ठरो” अशी माहिती देखील काही नागरीकांनी दिली आहे.