संगमनेरकराना ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्याची मेजवानी!
◻️ माजी मंत्री व कॉग्रेसचे जेष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
◻️ महानाट्याची जाणता राजा मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे
संगमनेर LIVE | काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर ४ ते ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सायंकाळी ६ वा. खा. डॉ अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वाना हे महानाट्य मोफत पाहता येणार आहे.
निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे, राज शिष्टाचार, जलसंधारण असे विविध महत्त्वाचे खाते भूषवले असून या सर्व खात्यांना लोकाभिमुख बनवले आहे. याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, वर्किंग कमिटीचे सदस्य, विधिमंडळ पक्षनेते या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळताना संगमनेर तालुक्याला विकासाचे मॉडेल बनवले आहे.
संगमनेर शहरासाठी निळवंडे थेट पाईपलाईन योजना, बायपास, हायवे, हॅप्पी हायवे, विविध वैभवशाली इमारती, हायटेक बस स्थानक यांसह गार्डन युक्त शहर, नागरिकांसाठी सातत्याने विविध सुविधा, सर्व धर्म समभाव हे वैशिष्ट्य ठरले आहे. याचबरोबर सहकारातून समृद्धी निर्माण करताना विविध सहकारी व शैक्षणिक संस्था देशपातळीवर आग्रमाणांकित ठरल्या आहेत.
दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिल्याने ते महाराष्ट्राचे खरे जलनायक ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. अत्यंत साध्या पद्धतीने आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम वाढदिवस केला असून यावर्षी लोकनेते बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील मराठ्यांचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते महानाट्य ४ ते ७ फेब्रुवारी या काळात जाणता राजा मैदानावर सर्वांना मोफत पाहता येणार आहे.
आमदार थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या या भव्य दिव्य महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी महाराज भूमिकेत असून महाराणी येसूबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, कविकलशांच्या भूमिकेत अजय तकपिरे, सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेरखान आणि मुकर्रबखानाच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडतेंसोबत अनेक सिनेकलावंतांचा सहभाग या असणार आहे.
तडाखेबाज संवाद, १२० फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती,घोडे आणि बैलगाड्यांचा वापर, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत १५० पेक्षा जास्त कलाकार सहभागी होणार आहेत. या महानाट्याची जाणता राजा मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे.
सर्वांसाठी मोफत असलेल्या या महानाट्याचा सर्व नागरिक तरुण बंधू-भगिनी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात मित्र मंडळ, व गौरव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मोफत महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांकरता दररोजचे नियोजन..
शिवपुत्र संभाजी या महानाट्यासाठी रविवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. जिल्हा परिषद घुलेवाडी व साकुर गट यांसह शहर प्रभाग क्रमांक १, २ व ५, यानंतर ५ फेब्रुवारी रोजी वडगाव पान व संगमनेर खुर्द गट आणि शहरातील प्रभाग क्रमांक ३,४,६, यानंतर ६ फेब्रुवारी रोजी आश्वी जोर्वे व समनापुर गट आणि शहरातील प्रभाग क्रमांक ७,८,९,१०, आणि ७ फेब्रुवारी रोजी धांदरफळ व बोटा गट आणि शहरातील प्रभाग क्रमांक ११, १२, १३, १४, असे नियोजन करण्यात आले असून यानुसार सर्वाना पास देण्यात येणार आहे.