‘गंगावेस’ देशातील दर्जेदार तालीम बनवणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

संगमनेर Live
0
‘गंगावेस’ देशातील दर्जेदार तालीम बनवणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

◻️ हेरिटेज लुक राहणार कायम ; २०० मल्लांची राहण्याची सोय ; ऑलिम्पिकच्या धर्तीवर मॅटची सुविधा

संगमनेर LIVE (कोल्हापूर) | राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लूक कायम ठेवून गंगावेस देशातील दर्जेदार तालीम बनवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार केली. यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या.

उपमुख्यमंत्री पवार यांनी आज सकाळी श्री शाहू विजयी गंगावेस तालमीस भेट दिली. येथील मल्ल व वस्तादांची राहणे, भोजन व्यवस्थेसह परिसराची पाहणी करुन वस्ताद व मल्लांशी संवाद साधला.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता सर्जेराव पाटील, वस्ताद विश्वास हारुगले, हिंदकेसरी संतोष वेताळ, महान भारत केसरी माऊली जमदाडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, तालमीचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष राहुल जानवेकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माणिक पाटील - चुयेकर, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील- आसूर्लेकर, आदिल फरास आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला. अनेक तालमी बांधल्या. यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत. हीच परंपरा कायम राहण्यासाठी तालमींमध्ये वस्ताद व मल्लांना सर्व सुविधा असणाऱ्या तालीम बनवणे आवश्यक आहे. यासाठी देशभरातील चांगल्यात चांगल्या तालमीचा अभ्यास करुन त्या धर्तीवर गंगावेस तालमीचा विकास करण्यात येईल. यासाठी विविध आर्किटेक्टकडून सर्व सोयीसुविधांचा समावेश असणारे आराखडे मागवून घ्यावेत. यातील सर्वोत्कृष्ट आराखडा मंजूर करून त्यानुसार या तालमीचा विकास करु, असे त्यांनी सांगितले.

यावेळी तालमीत सध्या प्रशिक्षण घेत असणाऱ्या मल्लांची संख्या, वस्ताद व मल्लांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था, वय, गाव, किती वर्षापासून तालमीत प्रशिक्षण घेत आहेत, शिक्षणाची व्यवस्था आदींविषयी त्यांनी मल्लांशी संवाद साधला.

तालमीचे नूतनीकरण करताना याठिकाणी आवश्यक असणाऱ्या सुविधा, ऑलिंपिकच्या धर्तीवर मॅट, माती, स्वच्छतागृह, शॉवर, मजबूत भिंती, कौले, उपलब्ध जागेत मिळणारा एफएसआय आदींबाबत विचार करा, असे सांगून तालमीचा विकास करताना हेरिटेज टच कायम ठेवा, २०० मल्लांची राहण्याची व्यवस्था करा, हवा खेळती राहील व या जागेतील वृक्षतोड होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

गांगावेस तालमीत सध्या ७० मल्लांची राहण्याची सोय असून बऱ्याच मल्लांना बाहेर रहावे लागते. तालमीची पडझड होत असून तालीम व राहण्याची सोय होणे गरजेचे आहे, असे आवाहन वस्तादांनी केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !