ऑनलाईन टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीचे काम अभियान स्वरुपात राबवा
◻️महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे यंत्रणाना निर्देश
◻️आतापर्यंत २१ हजार ३२५ पशुधनाची नोंदणी
संगमनेर LIVE (अहमदनगर) | पशुधनास ऑनलाईन टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीचे काम अभियान स्वरुपात राबविण्याचे निर्देश राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथुन दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महसुल मंत्री विखे पाटील बोलत होते.
महसुल मंत्री विखे पाटील म्हणाले की, दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. परंतु या अनुदानासाठी पात्र पशुधनाच्या कानात टॅगिंग करुन भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी आवश्यक असल्याने या कामास गती देत अभियान स्वरुपात हे काम पुर्ण करण्यात यावे. शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या दुध अुनदानापासुन एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देशही महसुल मंत्री विखे पाटील यांनी याावेळी दिले.
पशुधनास टॅगिंग व नोंदणीस शेतकरी, पशुपालकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत २१ हजार ३२५ पशुधन नोंदणी, ५ हजार ८२४ पशुपालक नोंदणी, १३ हजार ११५ पशुपालक हस्तांतरण नोंदणी १ हजार ७७२ पशुधनाच्या नोंदीत बदल, ५८५ कानातील टॅग बदल नोंदी, १ हजार ७८२ पशुपालकांच्या नावातील बदल तसेच अतिरिक्त ५० हजार टॅग नव्याने उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती मंत्रीमहोदयांना दिली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांनी कळविले आहे.