ओबीसींवर अन्याय नाही ; सगळ्या समाजाला न्याय - चंद्रशेखर बावनकुळे
संगमनेर LIVE (मुंबई) | ओबीसींवर अन्याय होईल, असा निर्णयही राज्य सरकार घेणार नाही व घेतलेला नाही. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि महायुती सरकार सकारात्मकच होते, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्षांनी एक्सवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो. अतिशय सकारात्मक पद्धतीने त्यांनी हे आंदोलन केले. चांगला मार्ग यातून निघाला, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून सरकारने मोकळा केला आहे. त्याची पद्धत सोपी केली आहे. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. कायद्याचा आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच सांगत आहेत ; तीच भूमिका कायम आहे, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.