तरुण पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा विचार आत्मसात करावा - खा. शरद पवार
◻️ आश्वी बुद्रक येथील कार्यक्रमात खा. शरद पवार यांनी जागवल्या १९५४ व १९८४ सालच्या आठवणी
संगमनेर LIVE | भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांनी नेमलेल्या पंडीत नेहरूंच्या मंत्री मंडळात डॉ. आंबेडकर यांचा समावेश होता. त्यावेळी भारतात भाक्रा - नागल धरणाची निर्मीत झाल्यामुळेचं पंजाब व हरियाणाचा ९८ टक्के भाग हा सुजलाम सुफलाम झाला. त्याचं काळात भंडारदरा, घाटघर, सारख्या धरणांची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी देशाला वीज निर्मितीची दृष्टी दिली. त्यामुळे आंबेडकराच्या विचारांशी बांधिलकी ठेवून नव्या पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा विचार आत्मसात करावा असे आवाहन जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रक येथे रिपाईचे नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जेष्ठ नेते शरद पवार बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आमदार सत्यजित तांबे, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, प्रकाश गजभिये, अरुण कडू पाटील, बाळासाहेब गायकवाड, रणजित सिंह देशमुख, राजेंद्र फाळके, उत्कर्षा रुपवते, विजय वाकचौरे, अशोक गायकवाड, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, अॅड. माधवराव गायकवाड, रावसाहेब म्हस्के, दुर्गाताई तांबे आदि उपस्थित होते.
खासदार शरद पवार आश्वी येथील आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, मोठे बंधू अप्पासाहेब पवार हे प्रवरानगर कारखान्यात नोकरीनिमित्त होते. त्यावेळी मी प्रवरानगर येथे शिक्षणासाठी असल्यामुळे मित्रांसमवेत आश्वी, कोल्हार, लोणी या आजूबाजूच्या गावात येत असल्याच्या आठवणी जागवल्या.
माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात आपल्या भाषणात म्हणाले की, ज्येष्ठ नेते खा. शरद पवारांमध्ये कार्यकर्ते सांभाळण्याचे कसब आहे. पवारांच्या निर्णयाने पुरोगामी महाराष्ट्राला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळाली आहे. राजकारण करत असताना खूप अडचणी येत असतात. मी पाच विधानसभेच्या निवडणुक लढविल्या, त्यावेळी ही अडचणी होत्या, आताही आश्वी परिसरात कार्यकर्त्याना काम करताना त्रास देऊन त्यांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. परंतु आपणही आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे थोरात यांनी सांगताना कृषी मंत्री पदाच्या काळात सहा वर्ष शरद पवार यांच्या बरोबर केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान यावेळी बाळासाहेब गायकवाड, अशोक गायकवाड, आ. प्राजक्त तनपुरे, आ. सत्यजित तांबे, डॉ. सुधीर तांबे, रावसाहेब म्हस्के, श्रीकांत भालेराव आदिची भाषणे झाली.