दुर्दैवी घटनेत आश्वी खुर्द येथील दोन झोपड्या जळून खाक
◻️ राहत्या घरासह संसार उपयोगी साहित्याची राखरांगोळी ; कुटुंब रस्त्यावर
◻️ आश्वी खुर्द ग्रामस्थांकडून मदतीचा ओघ मात्र, भरीव मदतीची गरज
संगमनेर LIVE (आश्वी) | २६ जानेवारी रोजी सर्वत्र प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदाचे वातावरण असताना आश्वी खुर्द (ता. संगमनेर) शिवारात मोलमजुरी करुन राहत असलेले गरीब कुटुंब कामानिमित्त घरापासून लांब अंतरावर गेले असता सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्याच्या दोन झोपड्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आश्वी खुर्द येथील अनिल गोपीनाथ शिंदे यांच्या वस्तीनजीक श्रीमती जनाबाई दादाराम माळी व संतोष नामदेव माळी यांच्या राहण्यासाठीच्या दोन झोपड्या होत्या. शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी या कुटुंबातील सर्व व्यक्ती कामानिमित्त घरापासून लांब अंतरावर गेल्या होत्या. यानंतर ९.३० वाजेच्या सुमारास या दोन्ही झोपड्या मधून भिषण आगीत लोळ उठू लागले व दोन्ही झोपड्या जळून खाक झाल्या. त्यामुळे या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, महत्वाची कागदपत्रे आणि अंगावर घालायचे व झोपण्यासाठी वापरातील कपड्यांची राखरांगोळी झाली आहे. डोक्यावरील छत गायब झाल्याने हे कुटुंब रस्त्यावर आले आहे.
त्यामुळे गावातील अतुल (गणेश) भोकरे यांनी पुढाकार घेऊन हातावर पोट असलेल्या या दोन्ही कुटुंबाला मदत मिळावी यासाठी समाजमाध्यमात आव्हान केले. यानंतर या कुटुंबाला किराणा तसेच अर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला असला तरी, ही मदत तोडकी पडत असल्याने या कुटुंबाचा किमान निवारा तरी उभा राहिला पाहिजे, यासाठी अधिक भरीव मदतीची गरज असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कामगार तलाठी, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन या कुटुंबाला आधार दिला असून या दुर्दैवी घटनेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरीकांनी या गरीब कुटुंबाला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. तर अंगावरील कपड्याव्यतीरीक्त कांहीही या कुटुंबाकडे न राहिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.