कौठे कमळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती करीता साडेचार कोटीचा निधी मंजूर
◻️ महसूल तथा पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी माहिती
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तसेच कर्मचारी निवासस्थान इमारती करीता साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती महसूल तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कौठे कमळेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या कामाची प्रशासकीय मान्यता मिळवून निधी उपलब्ध करून दिला आहे.
आरोग्य केंद्राच्या इमारती समवेत कर्मचार्यांच्या निवासस्थाकरीताही निधीची उपलब्धता झाल्याने एकाचवेळी आरोग्य केंद्र आणि निवासस्थानाच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
यासर्व कामासाठी सुमारे ४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची उपलब्धता राज्यातील महायुती सरकारने करून दिल्याबद्दल कौठे कमळेश्वर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून प्राथमिक आरोग्य केंद्रास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.