माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उजव्या कालव्याचे पाणी पूजन
◻️ कालव्यांमधून पाणी येणे ही स्वप्नपूर्ती - बाळासाहेब थोरात
◻️ पिंप्री लौकी - अजमपुर, खळी, पानोडी, डिग्रस, अंभोरे गावात जल्लोष
संगमनेर LIVE | माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून धरण व कालवे पूर्ण झाले आहे. उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे गावोगावी जंगी स्वागत होत असून पारंपारिक वाद्य व ढोल ताशांच्या गजरासह जेसीबीतून फुलांची उधळण करत नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे भव्य स्वागत केले आहे. डाव्यानंतर उजव्या कालव्यातून निळवंडेचे पाणी आल्याने केलेल्या कामाचे समाधान व स्वप्नपूर्ती झाले असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
पिंप्री लौकी - अजमपूर, खळी, पानोडी, डिग्रस, अंभोरे येथे पाणी पूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, अनेक अडचणीवर मात करून निळवंडे धरण पूर्ण झाले आहे. डाव्या व उजव्या कालव्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला सरकारकडून वेळोवेळी निधी मिळवला त्यामुळे उजव्या कालव्यावरील मोठ्या जलसेतुसह बोगदे पूर्ण करत आज पाणी शिवारात आले आहे. हा अत्यंत आनंदाचा व समाधानाचा क्षण आहे.
ज्या लोकांनी या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते आता या कामाचा श्रेय घेऊ पाहत आहे. मात्र जनतेला माहित आहे काम कोणी केले आणि अडथळे कोणी आणले. आपण आनंदाने आणि अभिमानाने आत्मविश्वासाने सांगतो की आपण काम केले या सर्व कामांमध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मोठे सहकार्य लाभले आहे.
ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचा त्यांचा कायम आवर्जून उल्लेख केला आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता आहे मात्र ज्यांनी काहीच केले नाही. ते लोक प्रसिद्धीसाठी केविलवाना प्रयत्न करत आहेत.
संगमनेर तालुका विकास कामातून पुढे आहे ही विकासाची घोडदौड आपल्याला काय पुढे ठेवायचे आहे. पाणी आल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे पुढील अनेक पिढ्यांचे जीवन समृद्ध करणारे हे काम नियतीने आपल्या हातून करून घेतले असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी रणजीत सिंह देशमुख म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम गोरगरिबांचा विचार केला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी विविध विकासाच्या योजना राबवल्या याचबरोबर सर्वात मोठे काम निळवंडे च्या रूपाने उभे केले आहे पुढील अनेक पिढ्या त्यांचे योगदान विसरणार नाही.
दरम्यान यावेळी महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले. तर जेसीबी मधून फुलांची उधळण करत आमदार बाळासाहेब थोरात यांचे जंगी स्वागत गावोगावी करण्यात आले आहे.