प्रतीक्षा संपली.. उद्यापासून शिवपुत्र संभाजी महानाट्याचा थरार पाहता येणार!
◻️ दोनशे स्थानिक कलाकार सहभाग नोंदवणार
◻️ मराठी चित्रपट आणि मालिका कलाकाराची मांदियाळी
संगमनेर LIVE | काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. कृषी व महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर उद्या ४ ते ७ फेब्रुवारी २०२४ या काळात सायंकाळी ६ वा. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सर्व नागरिकांसाठी मोफत असून या महानाट्यासाठीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. स्थानिक २०० कलाकारांसह नाटकाचा पूर्ण सराव झाला असून सर्व नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
यशवंतराव चव्हाण व पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे आमदार बाळासाहेब थोरात यांनी १९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना राज्यात महसूल, कृषी सारखे अत्यंत महत्त्वाची खाते सांभाळली आहेत. याचबरोबर पक्ष संघटनेत प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना त्यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिले आहे. काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ असलेले आमदार थोरात यांचा सर्व पक्षांमध्ये अत्यंत मोठा आदर आहे. सुसंस्कृत नेतृत्व अशी ओळख असणारे आमदार थोरात यांनी दरवर्षी अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे.
यावर्षी मात्र संगमनेर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मराठ्यांचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते महानाट्य शिवपुत्र संभाजी हे रविवार दिनांक ४ ते ७ फेब्रुवारी या काळात जाणता राजा मैदानावर सर्वांना मोफत आयोजित केले आहे. याकरता तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांना घरोघर पास पोहोच केले आहेत
या भव्यदिव्य महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी महाराज भूमिकेत असून महाराणी येसूबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, कविकलशांच्या भूमिकेत अजय तकपिरे, सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेरखान आणि मुकर्रबखानाच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडतेंसोबत अनेक सिनेकलावंतांचा सहभाग या असणार आहे.
या महानाट्याची तयारी पूर्ण झाली असून सर्व प्रेक्षकांकरता बसण्यासाठी सुमारे २० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर एलईडी व्यवस्था, तडाखेबाज संवाद, १२० फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती, घोडे आणि बैलगाड्यांचा वापर, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत २०० पेक्षा जास्त कलाकार सहभागी होणार आहेत. या महानाट्याची तयारी पूर्ण झाली आहे.
दरम्यान सर्वांसाठी मोफत असलेल्या या महानाट्याचा सर्व नागरिक तरुण बंधू-भगिनी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात मित्र मंडळ व गौरव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे
मराठी चित्रपट व विविध मालिकांमधील कलाकार येणार..
खा. डॉ अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या विविध भूमिका करण्यासाठी मराठी चित्रपटासह मराठी मालिकांमधील अनेक अभिनेते व अभिनेत्री याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवर कलाकारांसमोर संगमनेर मधील दोनशे स्थानिक कलाकारांना या महानाट्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. जाणता राजा मैदान आकर्षक पद्धतीने सजवली असून ७ फेब्रुवारी चा उत्सव मोठ्या आनंदाने सर्व तालुक्यात साजरा होणार आहे.