गुन्हेगारांचा बाप ‘सागर’ बंगल्यात राहतो का? - नाना पटोले

संगमनेर Live
0
गुन्हेगारांचा बाप ‘सागर’ बंगल्यात राहतो का? - नाना पटोले

◻️ कॉग्रेस प्रदेशाध्यक्षाची विखारी टीका, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी 

संगमनेर LIVE (मुंबई) | महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करत आहेत यावरून महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे स्पष्ट होत आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा पोलीसांवर प्रचंड दबाव असून कायद्याने काम करु दिले जात नाही. आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत, त्यामुळे त्यांच्यात थोडीशी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
 
उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गोळीबार केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, उल्हासनगरमधील झालेल्या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड प्रकरणात शिंदे-भाजपा सरकार काय कारवाई करते ते आम्ही पाहत आहोत परंतु या प्रकरणाने भाजपाचा बुरखा फाडला गेला आहे. 

पोलीस स्टेशमध्येच गोळीबार करण्याची हिम्मत ही सत्तेचा माज दाखवते, हे कसले रामराज्य? पोलिसांवर सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड दबाव आहे, वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये दहशत आहे, सत्ताधारी आमदाराचे ऐकले नाही तर लगेच बदली केली जाते. कायद्याने काम करु नये म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जातो. महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून सरकार तातडीने बरखास्त केले पाहिजे.

गणेशोत्सवाच्या काळात सत्ताधारी पक्षाचा आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही उलट सरकारने त्यांना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदावर बसवले. पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाला मारहाण केली.

 ‘पोलीस आपले काहीच वाकडे करु शकत नाहीत, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे’ अशी मग्रुरीची भाषा सत्ताधारी पक्षाचा आमदार करतो. गुन्हेगारांचा बाप ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे का? सत्ताधारी पक्षाचा एक आमदार मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मागासवर्गीय मंत्र्यांच्या कंबरेत लाथा घालण्याची भाषा करतो. 

हे सर्व चित्र पहात राज्यात गुंडशाही माजली असल्याचे दिसत असून जनतेच्या कष्टाचे पैसे लुटले जात आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात प्रभूराम व सीतामातेचा अपमान होत होता, त्याला NSUI च्या मुलांनी विरोध केला तर त्यांच्यावरच कारवाई केली गेली. महाराष्ट्रात सध्या शिंदे-फडणवीस-पवार यांचे गुंडाराज सुरु, आहे असेही नाना पटोले म्हणाले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !