ज्यांनी विरोध केला त्यांच्याकडूनचं पाणी सोडल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न - बाळासाहेब थोरात
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उजव्या कालव्याचे जलपूजन
◻️ निळवंडे कालव्यातून आलेल्या पाण्याचे मोठे समाधान- बाळासाहेब थोरात
◻️“ये बंधा लय जोरात, बाळासाहेब थोरात” या गीतावर आनंदोत्सव
संगमनेर LIVE | निळवंडे धरण व डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून सरकारकडून वेळोवेळी निधी मिळवला. अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केलेले धरण आणि दोन्ही कालव्यांमधून आलेले पाणी हे पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे असल्यामुळे केलेल्या कामाचा मोठा आनंद व समाधान होत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
हिवरगाव पावसा येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या सह पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव येथे घेतलेल्या पाणी परिषदेतून निळवंडे येथे धरणाचा निर्णय झाला. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आपण १९९९ मध्ये पाटबंधारे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती मिळाली. अनेक अडचणीतून सातत्याने या कामासाठी निधी उपलब्ध केला. धरणाबरोबर डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम आपणच मार्गी लावले .
खरे तर महाविकास आघाडी सरकार असते तर ऑक्टोबर २०२२ मध्ये डाव्या कालव्यातून आणि मे २०२३ मध्ये उजव्या कालव्यातून पाणी आले असते. मात्र सरकार बदलले आणि कामे थांबवली. तरीही आपणच पाठपुरावा केला. आज केलेल्या कामाचे समाधान होत आहे. या पाण्यामुळे पुढील अनेक पिढ्या समृद्ध होणार आहे.
पुनर्वसित शेतकरी, अधिकारी, कर्मचारी अनेकांनी खूप मदत केली. परंतु ज्यांनी विरोध केला ते आता पाणी सोडले असे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. काम कोणी केले ते जनतेला माहिती आहे .मात्र स्थानिक काही खबरे निरोप देतात आणि चांगल्या कामात खोडा घातला जातो. नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण करून घेतले आहे. या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही सर्वांना पाणी मिळेल. याकरता मनोहर पुरा पॅटर्न सारखा नवीन संगमनेर पॅटर्न आपल्याला राबवायचा आहे. पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने सर्वसामान्य माणूस सुखावला हीच खरी मोठी आनंदाची देण असल्याचे ते म्हणाले.
माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धारणासाठी जागा निवडली. त्यामुळे वरच्या भागातून कालवे आले. जास्तीत जास्त भागाला पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी नियोजन केले आहे. पाणी देणारे कोण आहे आणि या कामाचे श्रेय कोण लाटू पाहते आहे हे जनतेला कळत आहे अशी टीकाही त्यांनी केली.
गावोगावी जोरदार जंगी मिरवणुकीने बाळासाहेब थोरात यांचे स्वागत..
“ये बंधा लय जोरात, बाळासाहेब थोरात” या गीतावर गावोगावी मोठ्या जल्लोषात तरुणाईने आमदार बाळासाहेब थोरात यांचे गावोगावी जंगी स्वागत केले. यावेळी प्रत्येक गावच्या शेकडो सुवासिनीने औक्षण करत पाण्याचे जलपूजन केले. तर ढोल ताशा व पारंपारिक गजरामध्ये झाले मध्ये हे अभूतपूर्व सोहळे संस्मरणीय ठरले आहेत.