आश्वी बुद्रुक सह परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
◻️ ५० तरुणांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान
◻️ ढोल ताशासह लेझीम आणि झांजरी पथकाच्या सुमधूर सुरांनी वेधले नागरीकांचे लक्ष
संगमनेर LIVE | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथील शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान कडून आयोजित रक्तदान शिबीरात सुमारे पन्नास तरुणांनी रक्तदान केले. शिव व्याख्याते बाळासाहेब शिंगोटे यांचे शिव व्याख्यान आणि सुप्रसिद्ध गायक अविनाश कदम यांच्या शिवगितांच्या कार्यक्रमाचा ग्रामस्थांनी अस्वाद घेतला.
शिव जयंतीचे औचित्य साधून रविवारी रात्री सुप्रसिद्ध गायक अविनाश कदम यांच्या शिवगितांच्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मन मुराद दाद दिली. सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभुमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथुन शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांनी आणलेल्या शिवज्योतीचे आश्वी बुद्रुक बस स्थानकावर तुषार ताजणे, राहुल शिंदे, डाॅ. अभिजीत गायकवाड, तुषार लामखडे, वैभव म्हसे, अभिजीत म्हसे, तुषार गायकवाड, किरण गायकवाड, प्रकाश गायकवाड, मंगेश शिंदे, अभिजीत गायकवाड, स्वप्नील ताजणे, प्रसाद शिंदे आदिसह शिवभक्त व ग्रामस्थांनी भव्य असे स्वागत केले.
याप्रसंगी शिव ज्योतीची ढोल ताशाचा गजरात आणि लेझीम झांजरी पथकाच्या सुमधुर तालासुरात “छत्रपती शिवाजी महाराज की जय” चा जयघोष करत सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूकीचा समारोप आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत समोर झाला. शिव व्याख्याते बाळासाहेब शिंगोटे, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच अरुणा विजय हिंगे, विजय हिंगे, अॅड. शाळीग्राम होडगर, माधवराव गायकवाड, गीताराम गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या हस्ते प्रतिमापूजन व महाआरती करण्यात आली.
यानंतर शिव व्याख्याते बाळासाहेब शिंगोटे (पारनेर) यांचे शिव व्याख्यान झाले. यावेळी झालेल्या भव्य रक्तदान शिबिरात सुमारे ५० तरुणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचा शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिव छत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थासह शिवप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
आश्वी खुर्द, शिबलापूर, उंबरी बाळापूर आदि परिसरातील गावांमध्ये देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी आश्वी खुर्द येथे देखील तरुणांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच मध्यरात्री शिव जन्मोत्सवानिमित्त “पाळणा सोहळा”, “आतिषबाजी” आणि “विद्युत रोषणाई” कार्यक्रम हे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ व शिवप्रेमीनी दिली आहे.