युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मेळाव्याचे सूक्ष्म नियोजन करा - राधाकृष्ण गमे
◻️ नाशिक विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे २८ व २९ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे आयोजन
संगमनेर LIVE (अहमदनगर) | शासनाच्या कौशल्य, विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने नाशिक विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा २८ व २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला असून विभागातील पाचही जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी युवकांची अधिकाधिक नोंदणी करावी. महारोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी मेळाव्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे, सहायक आयुक्त नी. ना. सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, नमो महारोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी नियोक्त्यांची मागणी आणि त्यानुसार कुशल मनुष्यबळ याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. मेळाव्याचा जास्तीत जास्त युवकांना उपयोग व्हावा यासाठी व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील संधी याबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजनही करण्यात यावे.
मेळाव्यात सहभागी होणाऱ्या युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीच्या संधी मिळतील यादृष्टीने विविध कंपन्यांशी संवाद साधत स्टॉलची मांडणी करण्यात यावी. युवकांना मेळाव्यासाठी सुलभतेने नोंदणी करता यावी यासाठी वेबलिंकमध्ये सुटसुटीतपणा असावा. महारोजगार मेळाव्याची माहिती विभागातील अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचावी यासाठी या मेळाव्याची विविध माध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात यावी.
महारोजगार मेळाव्यात मोठ्या प्रमाणात युवकांची उपस्थिती राहणार असल्याने या ठिकाणी सर्व मुलभूत सोई-सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सुचनाही विभागीय आयुक्त गमे यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले, मेळाव्यात सुमारे २०० आस्थापना सहभागी होणार असून जागेचे नियोजन, नोंदणी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा करण्यात येत आहेत. परिसरातील जिल्ह्यातील उमेदवारांनाही या संधीचा लाभ व्हावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.