सफायर आयडॉल मंचावर अवतरले संगमनेर पंचक्रोशीतील शेकडो गायक कलावंत

संगमनेर Live
0
सफायर आयडॉल मंचावर अवतरले संगमनेर पंचक्रोशीतील शेकडो गायक कलावंत

◻️ रमेश धर्माधिकारी यांनी पटकावला सफायर आयडॉल २०२४ होण्याचा मान

संगमनेर LIVE | लायन्स क्लब संगमनेर सफायरच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्थानिक गायक कलावंतांसाठी सफायर आयडाॅल मंच हक्काचे व्यासपीठ आहे. अनेक स्थानिक व गुणवंत कलाकारांना आपली कला सादर करता येते व त्यांच्या भविष्यातील सुवर्णसंधी त्यांना या निमित्ताने प्राप्त होतात असे प्रतिपादन लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सफायर आयडॉलच्या मंचावर केले.

याप्रसंगी व्यासपीठावर गिरीश मालपाणी, सुवर्णा मालपाणी, युनिकॉर्नचे संचालक गिरीश चुग, प्रकल्प प्रमुख सुनीता मालपाणी, संदीप चोथवे, डॉ. जितेंद्र पाटील, अध्यक्ष अतुल अभंग आदी मान्यवर उपस्थित होते.

सफायर आयडाॅल स्पर्धेचे हे ९ वे वर्ष आहे. प्रमुख अतिथी श्रीमती सुवर्णा मालपाणी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून स्थानिक कलाकारांमध्ये उत्कृष्ट गायक निर्माण करणारी ही स्पर्धा असल्याचे सांगितले. या मंचावरून अनेक गुणी कलावंत तयार होऊन आज महाराष्ट्रात विविध स्पर्धा ते गाजवत आहेत आणि संगमनेरचे नांव मोठे करत आहेत, ही संगमनेरकरांसाठी, सफायर क्लबसाठी आनंददायी बाब आहे. युनिकॉर्न चे डायरेक्टर गिरीश युग यांनी सफायर आयडाॅल गायन स्पर्धेच्या आयोजनाची मुक्तकंठाने प्रशंसा करून दरवर्षी प्रायोजकत्व स्वीकारण्याची हमी दिली. स्थानिक कलावंतांनी या संधीचा फायदा घ्यावा असेही आवाहन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सफायर आयडॉल स्पर्धा विद्यालय स्तर, महाविद्यालय स्तर व खुला गट अशा एकूण ५ गटात संपन्न झाली. शेकडो गायकांनी या स्पर्धेसाठी ऑडिशन दिल्या. त्यामधून निवडल्या गेलेल्या गायकांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी ३ ते ५ प्रथम गट, ६ ते ७ दुसरा गट, ८ ते १० तीसरा गट अशा तीनही गट मिळून ५० कलावंत विद्यार्थ्यांनी आपली गायन कला सादर केली.

दुसर्‍या दिवशी महाविद्यालयीन गट व खुल्या गटातील ६० कलावंत गायकांनी बहारदार पद्धतीने गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सदर स्पर्धेत शंभरहून अधिक गायक कलावंतांनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेतून प्रथम गटात प्रणित उमप, द्वितीय गटात यश केदारी, तृतीय गटात तन्वीर मिसाळ, महाविद्यालयीन गटात आकाश घुले, खुल्या गटात रमेश धर्माधिकारी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत सफायर आयडॉल २०२४ होण्याचा मान संपादीत केला. सदर स्पर्धेत ८ वर्षांपासून ७० वयोगटांतील सर्व कलांतांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी संगमनेर पंचक्रोशीतील सर्वच गायक कलावंत सफायर आयडॉलच्या मंचावर अवतरल्याचा अनुभव आला. अत्यंत बहारदार व तितक्याच स्पर्धात्मक आलेल्या आयडॉल स्पर्धेचे परीक्षक म्हणून अत्यंत अचूक परीक्षण सतीश मालवणकर, अनिरूद्ध शाळीग्राम, राम आहेर, प्रा. श्रीहरी पिंगळे यांनी केले.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख उद्योजक संदीप चोथवे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. जितेंद्र पाटील, प्रीती काळे, नम्रता अभंग यांनी केले. सफायर आयडॉल कार्यक्रमाच्या उत्कृष्ट संगीत संयोजनाची यशस्वी जबाबदारी गणेश गोर्डे, एडविन पेरी, मंगेश बिडवे, सौरभ रणधीर, आकाश साळवे यांनी उत्कृष्ट साथ संगत देत सांभाळली.

सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जेष्ठ सदस्य श्रीनिवास भंडारी, धनंजय गुंजाळ, कल्याण कासट, महेश डंग, डॉ. अमोल पाठक, अध्यक्ष अतुल अभंग, सेक्रेटरी जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा, तसेच मालपाणी लॉन्सचे विनायक भोईर, दत्ता जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !