उंबरी बाळापूर शिवारात गोवंश तस्करी करणारे वाहण तरुणांच्या सतर्कतेमुळे पकडले
◻️ ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ; दोघे पळाले एक मात्र पोलीसांच्या ताब्यात
संगमनेर LIVE | गोवंश जनावराची तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब वारंवार संगमनेर तालुक्यातील शहरी भागात उजेडात येत होती. ग्रामीण भागात देखील गोवंश तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात काही तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे गोवंश तस्करी करणारे वाहन पकडण्यात यश आले असून याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार दि. १४ फेब्रुवारी रोजी एक वाहनात संशयास्पद हालचाली व गोवंश तस्करी होत असल्याची माहिती आश्वी पोलीस ठाण्यात कळविण्यात आली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल वाकचौरे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल पथवे, पोलीस कॉन्स्टेबल रतन वाघ यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. घटनास्थळी पोलीसांचे पथक दाखल होईल पर्यत स्थानिक नागरिकांनी गोवंश तस्करीचे वाहन व एका व्यक्तीला धरुन ठेवले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तस्करीचे वाहन व त्या व्यक्तीला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. तर दोघे पळून गेल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान आश्वी पोलीसानी १३ हजार ५०० रुपये किंमतीची ९ जर्शी वासरे व ५० हजार रुपये किंमतीचे पिकअप वाहण (एम एच ११ एजी ३२४६) जप्त केले असून पोलीस कॉन्स्टेबल आनंद वाघ यांच्या फिर्यादीवरून रहियान पठाण, रियान शेख व सोनु कुरेशी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नबंर ३४/२०२४ नुसार भादंवी कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ), ९, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संगीता खेमनर या पुढील तपास करत आहे. तर या पकडलेल्या गोवंश वासरांना मांची येथील उज्ज्वल गोरक्षण केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.