छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि गुण प्रत्येकाने आचरणात आणावेत - जिल्हाधिकारी
◻️ जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
संगमनेर LIVE (अहमदनगर) | युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. अठरा पगड मावळ्यांचे संघटन करत महाराजांनी संघर्षातून स्वराज्याची निर्मिती केली. शिवजयंतीचा आनंदोत्सव घराघरात साजरा करतानाच, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे गुण प्रत्येकाने आचरणात आणावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.
कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यक डॉ. संजय कळमकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, अतुल चोरमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजानांना अभिवादन करत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, शौर्य, पराक्रम, नियोजन, दूरदृष्टी, गुणग्राहकता, व्यवस्थापन, धैर्य, अचूक धोरण, दृष्टीकोन, कुशल संघटन, नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, दृष्टेपणा, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था नवनिर्माता, रयतेची बांधिलकी या सर्वांचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या प्रत्येक गुणांवर कादंबरी निर्माण होईल, असे आपले राजे होते. चांगल्या समाजाची निर्मिती, सार्वजनिक कल्याणाचे काम महाराजांनी केले असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली. पाणीसाठ्याच्या निर्मितीसाठी अनेक बंधारे, विहिरींची निर्मितीही केली. वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षांच्या संवर्धनालाही प्राधान्य दिले. आपल्या जिल्ह्यात दरवर्षी कमी होणाऱ्या पर्जन्यमानामुळे सातत्याने दुष्काळसदृष्य परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागतो. आधुनिकतेचा प्रवास करत असताना आपण निसर्गावर घाला घालत पुढे जात असुन त्याच्या दुष्परिणामाला आपणाला सामोरे जावे लागत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेत जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पर्जन्यमान व्हावे यासाठी येणाऱ्या पावसाळयात जिल्ह्यातील प्रत्येकाने एका वृक्षाची लागवड करुन त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. वृक्ष लागवड ही चळवळ व्हावी यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी आपल्या मनोगातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर, त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे यांनी केले. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ. अमोल बागुल यांनी मानले.