युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जगाचे प्रेरणास्थान - डॉ. सुधीर तांबे
◻️ संगमनेरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
संगमनेर LIVE | समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत सर्वांच्या प्रगतीसाठी कार्य करणारे तसेच लोकशाहीचा पाया घालून संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान असल्याचे गौरवोद्गार जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अभिवादन प्रसंगी काढले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी समवेत नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांसह विविध पदाधिकारी होते.
यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव, लोकशाही, गरिबांचे कल्याण ही शिकवण दिली. समाजातील अठरापगड जाती-जमातींना बरोबर घेऊन स्वराज्य उभारले. स्वाभिमानाची शिकवण दिली.
बलाढ्य शक्ती विरुद्ध लढताना स्वराज्यातील गोरगरिबांच्या हिताचे रक्षण केले. त्यांचा वारसा घेऊन प्रत्येकाने काम केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र अभ्यासले जात असून ते सर्वांसाठी स्फूर्तीदायी आहे. त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगले पाहिजे असेही ते म्हणाले
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे. लोककल्याणकारी शासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. स्वराज्यातील आणि परराज्यातील सर्वसामान्यांचा त्यांनी आदर सन्मान केला. धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया, लहान मुलं यांचा सर्वांनी सन्मान करावा असा नियम केला. लोकशाही चे तत्व त्यांनी जगाला दिली आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्येकाला जीवन जगताना मोठी स्फूर्ती देत असून मार्ग दाखवत असल्याचेही त्या म्हणाल्या.
विविध ठिकाणी जयंती साजरी..
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तर नगरपालिका तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.