◻️ अशोक चव्हाणांच्या राज्यसभा उमेदवारीचा प्रस्ताव नाही
◻️ मोदींच्या संकल्पाला साथ देणाऱ्यांचे स्वागतच
◻️ मुंबईमध्ये नाशिक, सोलापूर, लातूरचे अनेक नेते भाजपात प्रवेश करणार
संगमनेर LIVE | कॉंग्रेसमध्ये अंतर्गत घुसमट सोडविण्याची क्षमता नाही. त्यांचे नेते राहुल गांधी ओबीसी समाजाचा अपमान करतात ; पंतप्रधान मोदींबद्दल त्यांच्या मनात विष आहे. अशा राहुल गांधीसोबत कोण राहणार, असे उलटसवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, अशोक चव्हाण त्यांच्या राजीनाम्याची भूमिका ते लवकरच स्पष्ट करतील. अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारीचा या क्षणी माझ्याकडे कोणताही प्रस्ताव नाही. आमच्याकडे तीन जागा जिंकण्याचे बहुमत आहे. एक-एक जागा शिंदे व अजित पवार यांना मिळेल. राज्यसभा निवडणूक फार संघर्षाची होणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपात मोठे प्रवेश..
येत्या काळात मोठ्या प्रमाणात कॉंग्रेसचे नेते भाजपात येणार आहेत असे सांगून ते म्हणाले की, उद्या मुंबईमध्ये नाशिक, सोलापूर, लातूरचे अनेक नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या गॅरेटींवर व विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी भाजपात सर्वांचेच स्वागत आहे.
पंकजा मुंडे आमच्या केंद्रीय नेत्या..
पंकजा मुंडे या भाजपाच्या केंद्रातील नेत्या आहेत. मागील पाच वर्षांपासून त्या लोकप्रतिनिधी नसल्या तरी देखील त्यांच्या मतदारसंघात त्यांचा वावर आहे. कार्यकर्त्यांना उद्देशून त्या काल बोलत होत्या त्यांचे पूर्ण वक्तव्य पाहिले तर त्या प्रत्यक्ष काय म्हणाल्या हे सर्वांना कळेल.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी..
नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी सर्वेक्षण व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.