विखे पाटील कुटुंबाकडून सर्वत्र व्यापक काम सुरु असल्याने आरोपाला उत्तर कर्तृत्वातून द्या - खा. डॉ. विखे पाटील
◻️ आश्वी येथे बचत गटातील महिलांना दीड कोटी रुपयांचे साहित्य वाटप
संगमनेर LIVE (आश्वी) | निळवंडे धरण होऊ न देण्याबरोबरचं पाणी बंद करण्याचां आरोप कै. बाळासाहेब विखे पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यत करण्यात आले. ज्या कुटुंबावर आरोप झाले, त्यांच कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या हस्ते निळवंडे कालव्याना पाणी सोडण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे आरोप करणाऱ्याना परमेश्वरानेचं त्यांची जागा दाखवली आहे. आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने विखे पाटील कुटुंबाकडून सर्वत्र व्यापक काम सुरू असल्याने विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाला उत्तर कर्तृत्वातून द्या. अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्याना दिल्या आहेत.
आश्वी (ता. संगमनेर) येथे महाराष्ट्र बालविकास विभाग आणि ग्राम विकास व जलसंधारण विभाग, नवं तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान अंतर्गत 'ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहीत्य वाटप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विखे बोलत होते.
याप्रसंगी जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, भगवानराव इलग, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा कांचनताई मांढरे, रोहिणीताई निघूते, माधवराव गायकवाड, निवृत्ती सांगळे, भाऊसाहेब जऱ्हाड, अजय ब्राम्हणे, पोपटराव वाणी, विजय चतुरे, गीताराम तांबे, शांताराम जोरी, शिवाजीराव इलग, बबनराव काळे, दिनकर गायकवाड, सरूंनाथ उंबरकर, गोकुळ दिघे, अशोक म्हसे, संदीप घुगे, विजय म्हसे यांच्या सह सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व बचत गटातील महिला उपस्थित होते.
खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्याला आतापर्यंत अनेक पालकमंत्री मिळाले. परंतु ही पहिली वेळ आहे की, जिल्हा नियोजन निधीतून बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून दीड कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. जिल्ह्यात अनेक मंत्री झाले परंतु भाषणापलिकडे जाऊन महिलांना ताकत देण्याचा व सक्षम करण्याचा विचार झाला नाही. असा टोला ही त्यांनी नाव न घेता यावेळी लगावताना दरवर्षी ४० कोटी रुपये निधी दिला जाणार असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शिर्डी येथे पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून पाचशे एकरांवर एमआयडीसी उभी करण्याला परवानगी मिळाली आहे. याठिकाणी सध्या ५० कंपन्या येणार असून इलेक्ट्रीकल स्कूटर बनवण्याचा कारखाना उभा करण्यासाठी तैवान येथील कंपनीच्या शिष्टमंडळाने १०० एकर जागेची मागणी केल्याची माहिती डॉ. विखे यांनी देऊन याठिकाणी उपलब्ध होणाऱ्या ७ ते ८ हजार नोकऱ्यांमध्ये आतापर्यत वंचित राहिलेल्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला नोकरी अथवा रोजगार उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.
विरोधकांचा समाचार घेताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, आरोप करणाऱ्यानी व्यक्तीगत खर्चातून किती घरांना मदत अथवा जीवनदान दिले हे सांगितले पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यावरील आरोप व अन्याय तसेच विखे पाटील कुटुंबावरील आरोपाला पुराव्यानिशी दोन महिन्यांनंतर उत्तर देणार असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात सध्या अनेक बेरोजगार झाले आहेत. त्यांना वरिष्ठ पातळीवर सोडा पक्षातही कोणी विचारत नाही अशी शेलकी टिका नाव न घेता विरोधकांवर करताना रामायणातील ‘मथरा’ची उपमा विरोधकाना दिली. तर विरोधकांच्या आरोपाला भाषणातून उत्तर न देता शासनाच्या विविध योजना गोरं गरीब जनतेपर्यत पोहचवून द्या. अशा सूचना कार्यकर्त्याना डॉ. विखे यांनी यावेळी दिल्या आहेत.
दरम्यान याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उपस्थित स्वयंरोजगार विक्री केंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट, औजारे बँक व बचत गटातील महिलांना बँक कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी केले.