एकविरा फाऊंडेशनच्या वतीने ‘महिला दिना’निमित्त मोफत आरोग्य शिबिर
◻️ महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसह रस्सीखेच आणि बॅडमिंटन स्पर्धा रंगणार
संगमनेर LIVE | काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त संगमनेर मध्ये भव्य मोफत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च व ९ मार्च रोजी २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत तज्ञ स्री रोग तज्ज्ञ व कॅन्सर तज्ज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मोफत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महिलांची विविध तपासणी करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास एसएमबीटी क्लिनिकच्या माध्यमातूनही तपासण्या व उपचार केले जाणार आहेत.
महिला दिनानिमित्त एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून सातत्याने विविध उपक्रमांची आयोजन केले असून यावर्षीही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
महिला टेनिस बॉल क्रिकेटसाठी संगमनेर तालुक्यातील ५१ संघांनी आपली नोंदणी केली असून रस्सीखेच व बॅडमिंटन स्पर्धेसाठी अनुक्रमे ४४ व ३१ संघांनी नाव नोंदणी केली आहे.
या स्पर्धेत प्रथम बक्षीस ७७७७ द्वितीय बक्षीस ५५५५ तर तृतीय बक्षीस ३३३३ रुपये सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
दरम्यान महिला दिनानिमित्त होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात मा. आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, सौ. शरयू देशमुख आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.