रामेश्वर देवस्थानसाठी ६ कोटी रुपयांचा निधी - डॉ. सुधीर तांबे
◻️ न्यायालयातून स्टे उठवत धांदरफळ बुद्रुक येथे कामाला केली सुरवात
◻️ भाजपकडून देवाच्या कामातही राजकारण होत असल्याचा आरोप
संगमनेर LIVE | काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळत आहे. आमदार थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात रामेश्वर देवस्थान करता ५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. तर आता नव्याने १ कोटी निधी मंजूर झाला असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामुळे या ६ कोटीतुन या परिसरात विविध विकास होणार असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले आहे.
धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर देवस्थान परिसरात आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून मिळालेल्या ६ कोटी निधीच्या कामाचा भूमिपूजन डॉ. सुधीर तांबे व इंद्रजीत थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, बाळासाहेब देशमाने, कारखान्याचे संचालक अनिल काळे, माजी सभापती अनिल देशमुख, सरपंच सौ. उज्वला देशमाने, उपसरपंच संकेत वनवे, सुनील देशमुख, विजय कोल्हे, दत्ता कासार, राजेंद्र देशमुख, रावसाहेब डेरे व विश्वस्त मंडळासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या निधीमधून अकोले संगमनेर महामार्ग ते रामेश्वर देवस्थान रस्ता कॉंक्रिटीकरण, सभामंडप उभारणे, भोजनालयाचे विस्तारीकरण करणे, हॉल बांधकाम करणे, परिसरात पेविंग ब्लॉक बसवणे, बाग बगीचा सुशोभीकरण आदींसह विविध कामाचा समावेश आहे.
यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीच्या विकासाकरता निधी मिळवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये रामेश्वर देवस्थान परिसराच्या विकासासाठी त्यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मिळवला होता. आता नव्याने पुन्हा एक कोटी रुपये निधी मिळवला असून या निधीमधून या परिसरात विविध विकास कामे होणार असल्याने हे तीर्थक्षेत्राबरोबर मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, रामेश्वर हे या परिसराचे नव्हे तर तालुक्याचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानच्या विकासासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी मिळवला असून धांदरफळ परिसरात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.
इंद्रजीत थोरात म्हणाले की, आमदार थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने विकास कामे होत आहेत काही लोक विनाकारण काम नसताना श्रेय घेण्याचा केवीलवाणी प्रयत्न करतात असेही ते म्हणाले.
वर्क ऑर्डरला स्टे देऊन सत्ताधारी भाजपकडून देवाच्या कामातही राजकारण..
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये रामेश्वर देवस्थान परिसराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. ३१ जानेवारी २०२२ रोजी या कामाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र भाजप व पालकमंत्री यांच्या राजकारणातून या कामाच्या वर्क ऑर्डरला स्टे दिला गेला. कोर्टातून या कामाचा स्टे उठवला असून पालकमंत्री व भाजपाने देवाच्या कामातही गलिच्छ राजकारण केले असल्याची टीका रामेश्वर देवस्थानचे सचिव दत्ता कासार यांनी केली आहे