प्रतिक्षा भंडारी पंचवीसाव्या वर्षी जैन साध्वीची दीक्षा घेणार
◻️ आश्वी बुद्रुक येथे ९ जून रोजी भव्य दीक्षा समारंभाचे आयोजन
संगमनेर LIVE आश्वी (योगेश रातडीया) | भ्रमाच्या प्रभावामुळे ऐहिक सुख आणि ऐषोआरामांकडे आकर्षित होणे हे अगदी सामान्य गोष्ट आहे. बहुतेक सर्वच जन असे जीवन जगण्याची स्वप्ने बाळगतात. परंतु, श्रीमंत व्यक्ती या ऐहिक सुखाचा त्याग करून अध्यात्मिक जीवनात पुढे जाण्यासाठी संन्यास स्वीकारतो असे क्वचितच घडत असते. आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथील उच्च शिक्षित आणि सधन कुटुंबातील मुमुक्षु कु. प्रतिक्षा भंडारी ही संसार सुखाचा त्याग करुन जैन भगवती दीक्षा घेऊन जैन साध्वी जीवनाचा ९ जून रोजी स्वीकार करणार आहे.
आश्वी बुद्रुक येथील चुन्नीलाल रतनचंद भंडारी उद्योग समूहाचे संचालक आणि प्रतिष्ठित व्यापारी सुशील रामचंद्र भंडारी यांची इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर असलेली मुलगी कु. प्रतिक्षा सुशील भंडारी (वय - २५) हिच्या मनात वैराग्य भावना निर्माण झाल्याने संसार सुखाचा त्याग करुन तिने जैन साध्वी वेश स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ९ जुन २०२४ रोजी जैन श्रमण संघाचे उपाध्याय जैन साधु प्रवीण ॠषीजी महाराज हे चतुर्विध संघाच्या उपस्थित तिला भगवती दीक्षा देणार आहेत.
याप्रसंगी उपाध्याय प्रवर प्रवीण ॠषीजी महाराज, मधुर कंठी तीर्थेश ॠषीजी महाराज, प्रखर व्याख्याता लोकेश ॠषीजी महाराज, उप प्रवरतिनी साध्वी सन्मतीजी महाराज व साध्वी वृंद, जिनशासन गौरव सुनंदाजी महाराज व साध्वी वृंद, सेवाभावी किर्तीसुधाजी महाराज, कैवल्यधाम प्रेरक कैवल्य रत्नाश्रीजी महाराज, मधुर व्याख्याता विश्वदरशनाजी महाराज, राजस्थान विरांगना जयश्रीजी महाराज, उप प्रवरतीनी चन्द्रन बालाजी महाराज, बुलंदवानी पदमावतीजी महाराज आदी सह मोठ्या संख्येने साधु, साध्वी, संत व राज्यभरातून मोठ्या संख्येने जैन बांधव आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या भव्य दीक्षा समारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.