महात्मा गांधीं यांच्या संगमनेर भेटीला १०३ वर्ष पूर्ण!
◻️ जेष्ठ साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर यांचा विशेष लेख
१९२० साली लोकमान्य टिळक गेले आणि देशात गांधीयुग सुरू झाले. देशभर गांधीजींविषयी प्रचंड औत्सुक्य होते. लोक त्यांच्या सभांना मोठी गर्दी करायचे. संगमनेरलाही स्वातंत्र्य चळवळ जोमात सुरू होती. असहकाराची चळवळ जोर धरीत होती. महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली होती. गावोगाव यासाठी ते निधी संकलित करीत होते. लोकांना स्वदेशी कपडे, स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहन करीत होते.
संगमनेरातल्या काकासाहेब पिंगळे, बापूसाहेब पारेगावकर, तुकाराम निऱ्हाळी, गंगाधर दळवी, मुरलीधर जयरामदास मालपाणी, जगन्नाथ दळवी, गणेश सखाराम सराफ, लालसाहेब पीरजादे, शिवनारायण नावंदर, बाबुराव ठाकूर, शंकरराव संत वकील आदी पुढारी मंडळींनी महात्मा गांधींना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिले. गांधीजींनी ते स्वीकारले. खुद्द गांधीजी संगमनेरला येणार म्हणून संगमनेरसह आसपासच्या गावात चैतन्य पसरले.
अखेरीस २१ मे १९२१ रोजी भुसावळची सभा संपवून गांधीजी संध्याकाळी नाशिकला आले आणि तिथून थेट ते संगमनेरला आले. सोबत महादेवभाई देसाई हे देखील होते. आज त्यावेळचा इतिहास वाचताना आश्चर्य वाटते, गांधीजींची मुक्कामाची व्यवस्था सोमेश्वर मंदिरात करण्यात आली होती. यामागचे नेमके कारण कळायला आज तरी मार्ग नाही मात्र गांधीजींचाच कुणाच्याही घरी थांबण्याला विरोध असावा म्हणून अशी सोय करण्यात आली आली असावी. गांधीजी मंदिरात थांबले. मंदिरात काही देवतांच्या छोट्या मूर्ती होत्या त्यातील एका मूर्तीच्या अंगावर अतिशय सुंदर असे कपडे होते... गांधीजींनी ते बघितलं आणि ते चिडले... कारण मंदिरातील देवाच्या मूर्तीवर विलायती कापडाचे कपडे होते... दुसरे एक असेही कारण होते की बिगर हिंदू मंडळींना मंदिरात येऊन भेटता येणार नाही म्हणून त्यांनी मुक्कामाची जागा बदलण्याचे ठरवले. त्या रात्री ते वीरचंद श्रीचंद गुजराथी यांच्या घरी मुक्कामाला थांबले. ती जागा म्हणजे संगमनेरचा सध्याचा गांधी चौक.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ मे रोजी नगरपालिकेच्या प्रांगणात गांधीजींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेरबरोबरच आसपासच्या गावातूनही मोठ्या संख्येने लोक या सभेसाठी उपस्थित होते. या सभेत चार हजार रुपयांचा निधी जमा झाला.
विशेष कौतुकाची ठरलेली गोष्ट म्हणजे गांधीजींनी सभेत लोकांना टिळक स्वराज्य फंडासाठी देणगी देण्याचे आवाहन केल्यावर सभेसाठी उपस्थित असलेल्या एक गृहिणी द्वारकाबाई मोहनीराज देशपांडे यांनी आपल्या हातातील सोन्याची एक पाटली गांधीजींकडे सुपूर्द केली. १९२१ साली स्त्रियांना सासुरवाशीण म्हणून संबोधले जायचे, अशा काळात संगमनेरला एका जाहीर सभेला महिलांनी येणे आणि या सभेत घरचे काय म्हणतील याची पर्वा न करता हातातील सोन्याची पाटली काढून देणे ही खूप धाडसाची गोष्ट होती असेच म्हणावे लागेल.
याच सभेत संगमनेर शहरातील नागरिकांच्यावतीने गांधीजींना तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले मानपत्र देण्यात आले. हे मानपत्र गांधीजींनी त्यांची आठवण म्हणून नगरपालिकेकडे सुपूर्द केले. महादेव शंकर शिंदे नावाच्या कारागिराने तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले हे मानपत्र सध्या नगरपालिकेकडे उपलब्ध आहे.
या सभेनंतर महात्मा गांधी कोपरगाव मार्गे येवला येथे सभेसाठी रवाना झाले. संगमनेरच्या सभेचा वृत्तांत ९ जून १९२१च्या नवजीवन या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता.
आज २२ मे रोजी गांधीजींच्या या ऐतिहासिक सभेला १०३ वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने ही आठवण...
डॉ. संतोष खेडलेकर
(लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार आहेत)