धक्कादायक.. ब्लॅकमेलिंगला कंटाळून आश्वी परिसरातील तरुणाची पुण्यात आत्महत्या
◻️ तब्बल आर्धा कोटींची मागणी, अन्यथा फोटो गुगलवर टाकून बदनामीची दिली धमकी
◻️असा प्रसंग ओढावल्यास काय काळजी घ्याल..
संगमनेर LIVE | समाज माध्यमात टाकलेला फोटो मॉर्फ करत तो फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी मिळालेल्या आश्वी परिसरातील एका गावातील ३५ वर्षीय तरुणाने ब्लॅकमेलींगला कंटाळून पुणे येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आल्यामुळे आश्वी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पुणे येथे एका संशयित अज्ञात मोबाईल धारकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणांचा समाज माध्यमातील एक फोटो घेऊन त्या फोटोशी छेडछाड करण्यात आली होती. त्यानंतर त्याला वारंवार ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून हजारो रुपये उकळले होते.
त्यानंतरही संशयीतानी वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरुन फोन करुन मयत तरुणाकडे पैशासाठी तगादा लावत तब्बल आर्धा कोटी रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास ते फोटो गुगलवर टाकू व तुला बदनाम करू अशी धमकी देऊन संशयितांनी खंडणी मागितली. त्यामुळे कंटाळून या तरुणाने राहत्या घरी (पुणे) गळफास घेत आत्महत्या केली होती.
मयत तरुण हा एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. पत्नी आणि मुलासह तो पुणे येथे वास्तव्यास होता. पत्नी आणि मुलगा हे गावी गेले होते. त्यावेळी या तरुणाने गळफास घेतला. दरम्यान सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर गावी (आश्वी परिसरातील एका गावात) शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत.
असा प्रसंग ओढावल्यास काय काळजी घ्याल..
तुमची वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करताना सावध राहा. सोशल मीडिया प्रोफाइलवर किती माहिती तुम्ही शेअर करता, याची मर्यादा घाला. तुमचा पासवर्ड मजबूत ठेवा व कोणालाही देऊ नका.
तुमच्या ऑनलाइन हालचालींवर स्वतःच लक्ष ठेवा. तुम्ही कोणत्या वेबसाइट्सला भेट देता आणि तुम्ही कोणते ॲप्स वापरता यावर लक्ष ठेवा. तुमच्या डिव्हाइसवर अँटी व्हायरस आणि अँटी मॅलवेअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्स अपडेट ठेवा.
तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून धमकी किंवा छळ होत असल्यास, ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वेबसाइट किंवा कायद्याची मदत घ्या. तुम्ही डिजिटल अरेस्टला बळी पडल्यास, मित्र, कुटुंबाची मदत घ्या. तुम्ही सायबर अपराध हेल्पलाइनवर कॉल करून सायबर सेलकडूनही मदत मिळवू शकता.