अकोले तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार नाही

संगमनेर Live
0
अकोले तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार नाही 

◻️ आमदार किरण लहामटे यांच्या उपस्थितीत आंदोलकांना प्रशासनाचे आश्वासन

संगमनेर LIVE (अकोले) | अकोले तालुक्यासाठी अपेक्षित पाणी निळवंडे व भंडारदरा धरणामध्ये राखीव ठेवावे या प्रमुख मागणीसाठी आज सर्वपक्षीय कार्यकर्ते व अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने निळवंडे धरणावर आंदोलन पुकारण्यात आलेले होते. अकोले तालुक्याचे शेतकरी, लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय कार्यकर्ते  यांना विश्वासात न घेता आचारसंहितेच्या अडून निळवंडे व भंडारदरा जलाशयातून अमर्याद पाणी वाहून नेले जात होते. याला अटकाव व्हावा यासाठी व अकोले तालुक्याच्या पाणी हक्काचे रक्षण व्हावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे हे आंदोलनाला स्थळी उपस्थित होते. यावेळी दोन तास अकोल्याच्या पाणी हक्काच्या बद्दल वैचारिक चर्चा झाली. 

भंडारदरा धरणामध्ये ११.७५ टक्के वाटा अकोले तालुक्याचा आहे. यानुसार साधारणपणे १ टीएमसी पाणी भंडारदरा धरणात अकोले तालुक्यासाठी हक्काचे ठरते. निळवंडे धरणामध्ये निम्नस्तरीय कालव्या अंतर्गत ४२०० हेक्टर व उच्चस्तरीय कालवे अंतर्गत ३८०० हेक्टर क्षेत्र हे लाभ क्षेत्रात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाविष्ट करण्यात आले आहे. 

यानुसार निळवंडे धरणात सुद्धा अकोले तालुक्याचा पाणीवाटा एक टीएमसी निश्चित झाला आहे. भंडारदरा धरणाच्यावर आदिवासी शेतकऱ्यांसाठी एकूण क्षमतेच्या ६ टक्के पाणी राखीव आहे. यानुसार अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा भंडारदरा धरणामध्ये ६६० एमसीएफटी इतका वाटा निश्चित झाला आहे. यानुसार २६६० एमसीएफटी पाणी अकोले तालुक्याचे आहे. 

मात्र हे पाणी मोजण्याची कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्यामुळे हे पाणी सर्रास खाली वाहून नेले जाते व अकोले तालुक्यावर नेहमीच अन्याय होतो. पाणी वाहून नेण्याच्या काळात लाईट बंद केली जाते आणि हक्काच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जाते. यापुढे असे होता कामा नये. अकोले तालुक्याचे २६६० एमसीएफटी पाणी सोडून उर्वरित पाण्याचे काय नियोजन करायचे ते त्यांनी करावे, परंतु आमच्या पाण्याला यापुढे हात लावू नये अशा प्रकारचा सज्जड इशारा चर्चेच्या वेळी देण्यात आला. 

कळस येथे वॉटर मीटर बसवून अकोले तालुक्यात नक्की किती पाणी वापरले गेले याचे मोजमाप करून जे पाणी अकोले तालुक्याच्या हक्काचे आहे, मात्र वापरले गेले नाही ते अकोले तालुक्यासाठी विशेष आवर्तनाद्वारे दिले जावे अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

सध्या सुरू असलेले आवर्तन तातडीने थांबवण्याची आग्रही मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भंडारदरा व निळवंडे धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यापैकी १४०० एमसीएफटी पाणी हे दोन आवर्तनासाठी राखीव ठेवण्यावर संमती दर्शवण्यात आली. यानुसार अकोले तालुक्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचे फलित म्हणून ७०० एमसीएफटी ची दोन आवर्तने होतील इतके पाणी निळवंडे व भंडारदरा धरणात राखीव ठेवले जाईल ही मागणी मान्य करण्यात आली. 

यावेळी तालुक्याचे लोकप्रतिनिधी डॉ. किरण लहामटे, जेष्ठ नेते दशरथ सावंत, अगस्ती कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, शेतकरी नेते डॉ. अजित नवले, वसंत मनकर, महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, डॉ. संदीप कडलग, अशोक देशमुख, अशोक आरोटे, सतीश भांगरे, सुरेश  गडाख, तुळशीराम कातोरे, एकनाथ मेंगाळ, सदाशिव साबळे, सुरेश नवले, डॉ. मनोज मोरे, सीताबाई पथवे, शरद चौधरी, विनोद हांडे, स्वप्निल धांडे,  संदीप दराडे, मदन पथवे, रानकवी तुकाराम धांडे, संतोष नाईकवाडी, लक्ष्मण नवले, प्रदीप  हासे, विकास शेटे, नितीन नाईकवाडी, प्रमोद  मंडलिक, अक्षय अभाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !