पानोडी येथील बंद घरातून चोरट्यांनी ६५ हजार लांबवले
संगमनेर LIVE (आश्वी) | मुलाला भेटण्यासाठी पुणे येथे गेलेल्या पती पत्नीच्या मागे बंद घराचा कडी कोंडा तोडून घरातून ६५ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लाबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पानोडी (ता. संगमनेर) येथील अर्जुन सहादू खेडकर यांनी याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अर्जुन खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवार दि. १८ मे २०२४ रोजी मी पत्नी समवेत पुणे येथे मुलांकडे दवाखान्याच्या कामानिमित्त गेलो होतो. शुक्रवार दि. २४ मे रोजी सकाळी माझ्या घराशेजारील अनिकेत वाकचौरे यांनी घराचे दरवाजे उघडे असून कडी कोंडा कापला असल्याची माहिती मला फोन करून दिली.
त्यामुळे भाऊ एकनाथ खेडकर याला याबाबत सांगितले असता रात्री ८.३० वाजता घराचा दरवाजा व कुलुप व्यवस्थित असल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मी पत्नी समवेत पानोडी येथे आलो व घराची पाहणी केली असता कपाट, फ्रिज व इतर वस्तूची उचकपाचक केल्याचे दिसले. तर कपाटातील साडीत गुंडाळून ठेवलेले ६५ हजार रुपये चोरी गेल्याचे लक्षात आले.
दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवी कलम ४५४, ४५७ व ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.