विहिरीत पडलेल्या मोराला वाचवण्यात प्राणी मित्राना यश!
◻️ हसनापूर शिवारातील घटना ; मोर निसर्गोपचार केंद्रात दाखल
संगमनेर LIVE (लोणी/लखन गव्हाणे) | हसनापूर (ता. राहाता) शिवारातील ५० ते ६० फूट खोल विहिरीत पडलेल्या मोराला प्राणी मित्रांना वाचवण्यात यश आले असुन या जखमी मोराला पुढील उपचारासाठी निसर्गोपचार केंद्रात दाखल केले आहे.
हसनापूर शिवारात गुलाब पठाण यांची गट नंबर ४७ मध्ये शेती व विहिर आहे. रविवारी सकाळी ते शेतात नेहमीप्रमाणे गेले होते. यावेळी त्यांना मोराचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत खोलवर गेलेल्या पाण्यात मोर पडलेला होता. बाहेर पडण्यासाठी तो प्रचंड धडपड करत असताना, जिवाच्या आकांताने ओरडून मदत मागत होता.
त्यामुळे पठाण यांनी तात्काळ प्राणीमित्र प्रशांत आहेर आणि चंदू गजर यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यातील एक जण खाली उतरला व मोराला दोरी बांधून दुसऱ्याच्या मदतीने वर काढले. यानंतर जखमी मोराला वैद्यकीय उपचारासाठी निर्मल निसर्गोपचार केंद्रात दाखल केले असून प्रकृती ठिक झाल्यानंतर निसर्गात मुक्त केले जाणार आहे.
दरम्यान प्रचंड प्रमाणातील उन्हामुळे नैसर्गीक जलसाठे आटले आहेत. त्यामुळे तहान लागल्यामुळे पाण्याच्या शोधात हा मोर अंदाज न आल्यामुळे विहिरीत पडला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.