उद्या आश्वी बुद्रुक येथील आठवडे बाजार बंद!
◻️ आश्वी बुद्रुक सह तालुक्यातील निमोण आठवडे बाजाराचा समावेश
◻️ शिर्डी लोकसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश
संगमनेर LIVE (आश्वी) | मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शिर्डी लोकसभा निवडणूकीनिमित्त होणाऱ्या मतदानाच्या दिवशी उद्या सोमवार दि. १३ मे रोजी असणारा आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथिल आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत.
शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे सोमवारी गावात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा अथवा व्यत्यय निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने मतदानाच्या दिवशी आश्वी बुद्रुक सह तालुक्यातील निमोण येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे.
आश्वी बुद्रुक आठवडे बाजार निमित्त परिसरातील २० ते २५ गावांचा संपर्क येतो. यामुळे या बाजारात मोठी अर्थिक उलाढाल होत असते. तसेच या आठवडा बाजारात स्थानिक व्यवसायाबरोबरच अन्य ठिकाणचे लहान मोठे व्यावसायिकदेखील आपली दुकाने घेऊन येतात. भाजीपाला, फळे, कापड, धान्य, चप्पल, कटलरी साहित्य, शालेय साहित्य, खेळणी आदींची खरेदी-विक्री होऊन छोट्या व्यावसायिकांच्या देखील पदरात दोन पैसे पडतात.
दरम्यान उद्या सोमवारी भरणारा आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकरी तसेच छोट्या व्यावसायिकांना अर्थिक झळ सोसावी लागणार असली तरी मतदान प्रक्रीया शांततेत पार पडावी यासह आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.