२५ वर्षापासून अविरतपणे मृत देहाची ‘मानवसेवा’ करणारा अवलिया!
◻️ आश्वी ग्रामस्थांकडून दगडू पाटील गायकवाड यांच्या निस्वार्थ कार्याची दखल
◻️ मानधन देण्याच्या प्रस्तावाला समाज माध्यमातून एकमुखी पाठिंबा
संगमनेर LIVE (आश्वी/ संजय गायकवाड ) | माणसाच्या आयुष्यातील शेवटची घटका म्हणजे अंत्यविधी. मरणानंतर प्रत्येकाचे विधिवत सोपस्कार हे अंत्यविधी दरम्यान पार पाडले जातात. असे असले तरी स्मशान, मृतदेह, अंत्यविधी हे शब्द कानावर पडले तरी अनेकांच्या अंगावर क्षणभर काटा आल्याशिवाय राहत नाही.
मात्र, याचं अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडण्याचे व्रत आश्वी (ता. संगमनेर) येथील दगडू पाटील गायकवाड हे निस्वार्थ भावनेतून मागील २५ वर्षापासून करत आहेत. त्यांच्या यांचं समाज कार्याची दखल ग्रामस्थांनी घेऊन समाज माध्यमातून मांडलेल्या मानधन प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आश्वी खुर्द ग्रामस्थांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे आश्वी पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
दगडू केशव पाटील गायकवाड हे आश्वी खुर्द येथील संवेदनशील मनाचे गृहस्थ म्हणून पंचक्रोशीत परिचित आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असली तरी, आई - वडीलांनी दिलेली संस्कारांची श्रीमंती आजपर्यत त्यांनी स्वाभिमानी बाण्याने जपली आहे.
मागील अनेक पिढ्यांपासून सर्व जाती धर्माच्या मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार गावातील गायकवाड कुटुंबातील व्यक्ती या निस्वार्थ भावनेतून पार पाडत आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिवंगत भागाजी पाटील गायकवाड, मथु पाटील गायकवाड, तुकाराम पाटील गायकवाड आणि सर्जेराव पाटील गायकवाड यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालताना दगडू पाटील गायकवाड हे अंत्यविधी हे मानवसेवेचे सर्वात महत्त्वाचे काम असल्याचे मानून प्रसंगी पदरमोड करुन करत आहेत.
जात, पात, धर्म, गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव करताना दगडू पाटील गायकवाड कधी दिसत नाही. गावात कोणाचाही मृत्यू झाला तर, सर्वात आधी निरोप हा दगडू पाटील यांना दिला जातो. हातातील सर्व कामे सोडून ते थेट निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन अंत्यविधीच्या सामानाची जुळवाजुळव करतात. मृत कुटंबाचे सांत्वन करताना विधीची माहिती देतात. अंत्ययात्रा, अंत्यविधी ते रक्षा विसर्जन पर्यंतचे सर्व सोपस्कार ते त्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून पार पाडताना दिसत असल्याने आपोआप त्यांच्याशी गावातील प्रत्येक कुटुंबाचे ऋणानुबंध जुळले आहेत.
वडीलोपार्जित नाममात्र शेती जमीनीवर स्वाभिमानी दगडू पाटील गायकवाड यांचे कुटुंब उदरनिर्वाह करते. गावातील कोणत्याही मृत व्यक्तीच्या अंत्यविधीचा निरोप मिळाल्यानंतर सर्व सोपस्कार कोणताही मोबादला न घेता मागील २५ वर्षापासून ते पार पाडत आहेत. मात्र यांचं काळात पार पडणारा दशक्रिया विधी, तेराव्याचा विधी आणि धार्मिक विधीसह इतर गोष्टीवर कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात अर्थिक खर्च केला जातो.
त्यामुळे फूल ना फूलाची पाकळी म्हणून मृत व्यक्तीच्या कुटुंबाने त्यांना परिस्थितीनुसार मानधन द्यावे, असा मॅसेज समाज माध्यमात टाकण्यात आला होता. त्याला ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. मानधन देऊन दगडू पाटील गायकवाड हे करत असलेल्या कामाचे मोल होणार नसले तरी, त्यांनी ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीवरून मानधनाचा स्विकार केला आहे.
सौ. अलका बापुसाहेब गायकवाड, सरपंच, आश्वी खुर्द ता. संगमनेर