१२ जून संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलचा आज ८१ वा स्थापनादिन!
संगमनेरात त्या दिवशी मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. एका छोट्या दवाखान्याच्या जागी तत्कालीन शासनाच्या निर्णयानुसार कॉटेज हॉस्पिटलची सुरवात झाली होती. डॉ. बी. एल. काटे हे पहिले वैद्यकिय अधिकारी होते. सोबतीला आणखी एक स्त्री डॉक्टर, दोन नर्सेस, कंपाऊंडर, दोन स्त्री व दोन पुरुष कर्मचारी, एक सफाई कामगार आणि एक स्वयंपाकी असा स्टाफ नेमण्यात आला. तो दिवस होता १२ जून १९४३.
अर्थात यापूर्वी म्हणजे १८७३ मध्ये संगमनेर नगरपालिकेने पहिला दवाखाना सुरू केला. त्यावेळी संगमनेर हे छोटेसे खेडेच होते. सध्याच्या कोर्टाजवळ हा दवाखाना होता. डॉ. कृष्णराव जानू हे १८७३ मध्ये रुजू झालेले पाहिले वैद्यकीय अधिकारी.
१८८१ साली म्हाळुंगी नदीच्या बाजूच्या गढीवरील डी. एड. महाविद्यालयाच्या प्रशस्त जागी हा दवाखाना हलवला गेला. सध्या दगडी बांधकाम असलेली डी. एड. कॉलेजची जी इमारत उभी आहे ही नगरपालिकेच्या दवाखान्याची इमारत आहे. आता ही इमारत देखील ओस पडली आहे. या ठिकाणी स्त्री व पुरुषांसाठी दोन स्वतंत्र वार्ड होते.
१८८६ मधील एक आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार त्यावर्षी १५ हजार २१० लोकांनी या दवाखान्यात उपचार घेतले. १८८७ साली पालिकेने या दवाखान्यासाठी १५ रुपयांचे एक मोठे घड्याळ घेतले. या घड्याळाचे त्याकाळी लोकांना मोठे अप्रूप वाटायचे. त्याकाळात गरीब रुग्णांना मोफत भोजन पुरवले जायचे.
पुढची जवळपास पन्नास वर्षे याच ठिकाणी दवाखाना होता. संपूर्ण तालुक्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातील लोक उपचारासाठी संगमनेरला यायचे.
१९३७ - ३८ साली दवाखान्याच्या विस्ताराची गरज निर्माण झाली. सध्याच्या नगरपालिकेच्या आवारात मॅटर्निटी विभागाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागी रुक्मिणीबाई शिवलाल लाहोटी यांनी दिलेल्या तीन हजार रुपयांच्या देणगीतून संगमनेरमधील पाहिला मॅटर्निटी वॉर्ड बांधला. राधाबाई परशराम कर्वे यांच्या साडेतीन हजार रुपयांच्या देणगीतून दवाखान्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले. या दोन्ही इमारती आजही बघायला मिळतात.
१९४३ मध्ये इंग्रज सरकारने तालुक्यांच्या गावी कॉटेज हॉस्पिटल उभारण्याची योजना आखली. तत्कालीन मुंबई इलाख्यात एकूण पाच गावे निवडण्यात आली. या पाच गावात संगमनेरचा समावेश होता. संगमनेरला दवाखान्याच्या नव्या इमारतीचे काम सुरू झाले होतेच. २१ एप्रिल १९४३ रोजी शासकीय ठराव क्र. ४६६१/३६ नुसार या दवाखान्याला कॉटेज हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आला आणि प्रत्यक्षात १२ जून १९४३ ला नवा स्टाफ दाखल झाला.
१९५१ मध्ये इथे ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आले. १९५३ पासून पोस्टमार्टेम रुम तर १९५४ पासून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रूम उभारण्यात आली.
१९५६ च्या पुरानंतर गावातील काही व्यक्तींनी गरीब रुग्णांना औषध खरेदी करण्यासाठी मदत म्हणून ‘पूअर फंड’ सुरू केला. विशेष म्हणजे पालिकेनेही आपल्या एकूण उत्पन्नाच्या १२ टक्के रक्कम दवाखान्यासाठी खर्च करायला सुरुवात केली. १९५९ मध्ये हॉस्पिटल फंड म्हणून निधी जमा करायला सुरुवात केली.
गावातील नाट्यप्रेमी मंडळींनी अभिनव नाट्य संस्थेच्या माध्यमातून नाटके सादर करून कॉटेज हॉस्पिटलसाठी निधी जमा केला. याचबरोबर पालिका कर्मचारी, तिरुपती क्लब व गावातील दानशूर लोकांनी गरीब रुग्णांसाठी वर्गणी जमा करून निधी उभारला.
२१ वे शतक सुरू झाले, खासगी वैद्यकिय व्यावसायिकांची संख्या वाढली. कधीकाळी उपचार घेताना गरीब श्रीमंत असा भेद नव्हता, आज तीस पस्तीस पेक्षा अधिक वय असलेल्या बहुसंख्य संगमनेरकरांचा जन्म कॉटेज हॉस्पिटलमध्येच झाला आहे.
१८९७, १९०६, १९१३, १९१९, १९३४, १९४८, १९४९ मध्ये आलेली कॉलऱ्याची साथ, १८९९, १९०६, १९४५ ते १९४८, १९४९ या वर्षी आलेल्या प्लेगच्या आणि इतर अनेक आजारांच्या साथी, नुकतीच आलेली कोरोनाची आपत्ती, इतर छोटे मोठे आजार, अपघात यातून असंख्य संगमनेरकरांना या नगरपालिकेच्या जुन्या दवाखान्याने आणि नंतर कॉटेज हॉस्पिटलने जीवनदान दिले आहे.
संगमनेरकर नागरिकांच्या मागणीनुसार हे हॉस्पिटल पुन्हा एकदा जोमाने कार्यरत व्हावे ही अपेक्षा. कॉटेज हॉस्पिटलला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!
डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेर
(लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार आहेत.)