प्रेमात अडसर ठरणाऱ्या दोन मुलाना आईनेचं प्रियकराच्या मदतीने संपवलं
◻️ संगमनेर तालुक्यातील घटना ; गुन्हा दाखल
◻️ मुलाना शेततळ्यात बुडून मारल्याची धक्कादायक माहिती समोर
संगमनेर LIVE | दोन महिन्यांपूर्वी हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र, हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एप्रिल महिन्यात संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (वय - १२) आणि प्रणव सारंगधर पावसे (वय - ८) या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. वर्षभराआधी या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत होती.
मुलांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, पोलीस काहीही कारवाई करत नसल्याने काही दिवसांपूर्वी पुणे महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यानंतर पोलीसांनी सखोल तपास केला. यावेळी मुलांची आईने तिचा प्रियकर सचिन गाडे याच्या मदतीने हे सगळं केल्याचं समोर आलं.
यावेळी आईनेच प्रेमात अडसर ठरणाऱ्या आपल्या मुलांना शेततळ्यात बुडवून मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत या दोघांना गजाआड केलं आहे.
दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत पार पाडली आहे.