महाराष्ट्र सरकारने तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी - किसान सभा
संगमनेर LIVE | दूध, कांदा, सोयाबीन, कापूस, टोमॅटोचे भाव पाडून शेतकऱ्यांना लुटले. लुटले ते परत करा ! लूट वापसी करत असताना महाराष्ट्र सरकारने तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.
किसान सभेने पुढे म्हटले आहे की, भक्त मंडळी या मागणीबाबत खूपच नाराज झाली आहेत. महाराष्ट्र बुडवायचा आहे का ? नुसते फुकट मागा ! इत्यादी नेहमीचे बिनडोक युक्तिवाद सुरू झालेत. शेतकऱ्यांना मातीत घालून स्वस्ताचे खाल्ले तेंव्हा आपण फुकट खातो आहोत व याची किंमत शेतकऱ्यांना आत्महत्या करून किंवा तीळ तीळ झुरून चुकवावी लागते आहे याची जाणीव या भक्त जीवांना का नव्हती हा खरा प्रश्न असल्याचे म्हटले.
दुसरीकडे आम्हाला केवळ स्वातंत्र्य द्या कर्जमाफी नको ! असे फाईव्ह स्टार शेतकरी संघटनेच्या पुस्तकी कार्यकर्त्यांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. अरे स्वातंत्र्य व शेतीमालाला भाव तर हवाच. पण लूट वापसी म्हणून कर्जमाफी झाली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ?
आम्ही शेतकऱ्यांची पोरं लूट वापसी मागणार आहोत. बापाला आणि आईला लुटले ते परत करा म्हणत राहणार आहोत. शेतकरी आता वोट बँक म्हणून पुढे येत आहेत. मागील निवडणुकीत जात, पात, धर्म, देव, अस्मिता या साऱ्याच्या पलीकडे जात शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून मतदान केलेले आपण पाहिले आहे. हा चांगला संकेत आहे. उद्याचा सूर्य मित्रांनो आपलाच आहे. असेही किसान सभेने म्हटले आहे.