स्मृती इराणीचा पराभव करणाऱ्या अमेठीच्या खासदाराची संगमनेरला भेट
◻️ संगमनेरचा विकास पॅटर्न देशासाठी मार्गदर्शक - खासदार के. एल. शर्मा
◻️ बाळासाहेब थोरात यांचे स्थान दिल्लीमधील नेत्यांच्या हृदयात
संगमनेर LIVE | गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदार संघात भाजपच्या मंत्री स्मृती इराणी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून जायंट किलर ठरलेले व गांधी कुटुंबीयांचे विश्वासू नवनिर्वाचित खासदार के. एल. शर्मा यांनी आज विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृत उद्योग समूहास भेट दिली. यावेळी संगमनेरचा विकासाचा पॅटर्न हा देशासाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
संगमनेर तालुका व अमृत उद्योग समूहाच्या वतीने आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. सुधीर तांबे. सौ.दुर्गाताई तांबे, जयश्री थोरात सौ. किरण शर्मा, अंजली शर्मा, डॉ.नामदेवराव गुंजाळ, धीरूभाई ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.
खा. शर्मा यांनी सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरचा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी कॉलेज, अमृतवाहिनी बँक, डेंटल कॉलेज, शेतकी संघ, यशोधन या संपर्क कार्यालयास भेट देऊन आमदार बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा व विकास कामाच्या बाबत माहिती घेतली.
याप्रसंगी बोलताना खासदार शर्मा म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेस मधील महाराष्ट्रातील मोठे नेते असून थोरात घराणे हे काँग्रेसचे निष्ठावंत आहे. सहकारातून उभा केलेला ग्रामीण विकासाचा हा पॅटर्न संपूर्ण देशासाठी दिशादर्शक असून उत्तर प्रदेशात व विशेषता अमेठी मध्येही आपण राबवणार आहोत. एकनिष्ठता व विकासाची दूरदृष्टी असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्थान दिल्लीमधील नेत्यांच्या हृदयात आहे.
देशात काँग्रेसने वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्रातही काँग्रेसला चांगले भवितव्य असल्याचे ते म्हणाले. तर यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे होत असलेल्या कामांचा पाठपुरावा कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की, संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अमेठी मतदारसंघातून खासदार शर्मा यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. खासदार शर्मा हे राजीव गांधी सोनियाजी व खा. राहुल गांधी, प्रियंकाजी गांधी यांचे अत्यंत विश्वासू असून त्यांनी काँग्रेससाठी मोठे योगदान दिले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान यावेळी खासदार शर्मा व उत्तर प्रदेशातील विविध पदाधिकाऱ्यांनी सर्व संस्थांना भेटी दिल्या.