जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून गडाख कुटुंबीयांचे सांत्वन
◻️हिवरगाव पावसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता चिमुकलीचा मृत्यू
संगमनेर LIVE | हिवरगाव पावसा येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्या ओवी सचिन गडाख हिच्या कुटुंबीयांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्याचबरोबर या परिसरात बिबट्यासाठी जास्त पिंजरे लावून प्रभावी उपाययोजना करण्यासह ओवीच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठीच्या सूचना दिल्या.
हिवरगाव पावसा येथे नुकतीच बाळासाहेब थोरात यांनी गडाख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, विजय राहणे, डॉ. प्रमोद पावसे, संदीप पावसे, साईराम पावसे, सिताराम पावशे, राजेंद्र पावसे, विकास पावसे, मथाजी पावसे, अशोक भालेराव, अनिल गडाख, उपविभागीय वन अधिकारी सचिन लोंढे यांचेसह गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
बुधवारी ओवीची आई आपल्या शेतामध्ये जनावरांसाठी चारा काढत असताना चिमुकली ओवी बांधावर खेळत होती. तितक्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी आईने आरडाओरडा करत ओवीची सुटका केली. परंतु या बिबट्याने केलेले हल्ल्यात चिमुकल्या ओवीला जास्त जखमा झाल्याने ती मृत पावली.
आज काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मध्ये येताच गडाख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी वनविभाग व प्रशासनाला या परिसरात बिबट्या पकडण्यासाठी जास्तीचे पिंजरे लावण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर गडाख कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत तातडीने मिळावी याकरता प्रशासनाने कार्यवाही करावी याबाबतही सूचना दिल्या.
दरम्यान नागरिकांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी घाबरून जाऊ नये असा धीर ही सर्वांना दिला आहे. याप्रसंगी वन विभागाचे अधिकारी,गडाख कुटुंबीयांचे नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.