अमृतवाहिनी शाळेच्या विद्यार्थ्यानी घडविले आषाढी वारीचे दर्शन
◻️ वृक्षदिंडीतून पर्यावरण संदर्भात संवर्धनाचा संदेश
संगमनेर LIVE | आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून अमृतवाहिनी शाळेच्या ३००विद्यार्थ्यानी विठ्ठल, रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, यांसह विविध संतांच्या वेशभूषा करून विठ्ठल नामाचा गजर करत वृक्षदिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना आषाढी वारीचे दर्शन घडविले.
संगमनेर बस स्थानक, नवीन नगर रोड, जाणता राजा मैदान ते यशोधन कार्यालय यादरम्यान अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या ३०० विद्यार्थ्यांनी विविध संतांची वेशभूषा करून वृक्ष रोपण व संवर्धनाचा संदेश देत आषाढी वारीचे दर्शन घडविले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांचे सुदर्शन निवासस्थानी सौ. कांचनताई थोरात व डॉ. जयश्री थोरात यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी प्राचार्य श्रीमती शितल गायकवाड, श्रीमती शोभा हजारे, मुख्याधिकारी श्रीराम कुऱ्हे आदींसह विविध वर्गशिक्षक, वर्गशिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. दरवर्षी अमृतवाहिनीचे विद्यार्थी शहरातून वारीचे दर्शन घडवतात. अत्यंत सुंदर पोशाख आणि यातून विविध संत आणि त्यांनी दिलेल्या संदेशा बरोबरच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी पर्यावरण संवर्धनासाठी दिलेला दंडकारण्य अभियानाचा मंत्र या विद्यार्थ्यांनी जोपासला आहे.
चांगल्या शिक्षणाबरोबर चांगली आरोग्य आणि चांगले पर्यावरण याबद्दल चिमुकल्यांना शिक्षण देणे ही काळाची गरज बनली असल्याचेही त्या म्हणाल्या.
सौ. कांचनताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षांपासून अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर देशभक्ती रुजवताना त्यांना विविध राष्ट्रीय सण, विविध उत्सव अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी करून घेतले जात आहे. आजच्या या दिंडीत विठ्ठल, रखुमाई, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपान, तुकाराम, चोखामेळा या संतांच्या वेशभूषेतले विद्यार्थी विशेष आकर्षण ठरले.
यावेळी प्राचार्य श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार होणे हे अत्यंत गरजेचे आहे. आणि बालवयातच महाराष्ट्र, विविध परंपरा, देशप्रेम या सर्वांची ओढ निर्माण करण्यासाठी मॉडेल स्कूलच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जात आहे. सामाजिक समतेचा शिकवण देणारी ही आषाढी दिंडी सर्वांसाठी नक्कीच आनंददायी असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी विद्यार्थ्यानी फुगडी खेळत अभंग गात, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, विठू माऊली तू जगाची, जय हरी विठ्ठल या विविध अभंगांनी संगमनेर शहर दुमदुमून दिले.
सुदर्शन निवासस्थानी संतांचा मेळा..
वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले काँग्रेस मित्र मंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी बाल चिमुकले पांडुरंग रुक्माई सह संत ज्ञानेश्वर तुकाराम चोखामेळा या विविध वेशभूषांनी जमलेल्या ३०० विद्यार्थ्यांनी फुगडी खेळत अभंग गात दिंडी आली यावेळी सौ. कांचनताई थोरात यांनी या दिंडीचे स्वागत केले.