दूध हंडी आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
◻️ आंदोलनाच्या दहाव्या दिवशी कोतुळ बंद ठेवून पंचक्रोशीतील शेतकरी आंदोलनात सहभागी
संगमनेर LIVE (अकोले) | दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे शेतकरी गेली दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधले.
कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी यावेळी एकत्र आले होते. आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्याचे आंदोलन यावेळी करण्यात आले. वारकरी संप्रदायाने यावेळी आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला. अभंग व भजनाच्या निनादांमध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली व सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या.
दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे, पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. दूध हंडी फोडण्याच्या अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत या आंदोलनात भागीदारी केली.
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १५ जुलै ते २१ जुलै राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. आज पहिल्याच दिवशी दूध हंडी फोडून या आंदोलनाची सुरुवात झाली असून महाराष्ट्रभर विविध पद्धतीने हे आंदोलन पुढे जाणार आहे.
आंदोलनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बी. जे. देशमुख, सिताराम देशमुख, राजू देशमुख, बाळासाहेब गीते, विजय वाकचौरे, राजेंद्र गवांदे, गौतम रोकडे, निलेश तळेकर, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव आदि सहभागी झाले होते.