स्मारकाची संकल्पना मंत्री विखे पाटील याची, इतरांनी श्रेय घेवू नये - अमोल खताळ
◻️ स्मारकाच्या कामास निधी कमी पडू देण्याची पालकमंत्री विखे पाटील यांची ग्वाही
◻️ संगमनेर बसस्थानक येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारक कामासाठी मंत्री विखे पाटील यांच्याकडून पूर्वीच १ कोटीचा निधी
संगमनेर LIVE | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बसस्थानक परिसरात उभारण्याच्या पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेला महायुती सरकारच्या सहकार्याने आता मुर्त स्वरुप आले असून, बसस्थानक परिसरात हे स्थानक उभारण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे तर जिल्हा विकास व नियोजन समितीने या स्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर केला आहे.
जिल्ह्यात श्रीरामपूर, राहाता आणि संगमनेर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला होता. या स्मारकासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जागा उपलब्धतेबाबतचे ठरावही राज्य सरकारकडे पाठविण्यात आले होते.
या स्मारकाच्या कामाकरीता संगमनेरमधून श्री छत्रपती प्रतिष्ठान संगमनेर या नोंदणीकृत सर्वपक्षिय समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु करण्यात आला होता. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारकडे याबाबतचा पाठपुरावाही सुरु होता.
शिवप्रेमी आणि संगमनेरांची मागणी लक्षात घेवून बस स्थानक परिसरात अश्वारुढ पुतळा उभारण्यास महायुती सरकारने मान्यता दिल्याच्या निर्णयाचे श्री. छत्रपती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.
या जागेबाबतचे सर्व प्रशासकीय सोपस्कार पुर्ण होवून या जागेवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामास सुरुवात होईल असा विश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.
या स्मारकाच्या संपूर्ण कामासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर केला आहे. उपलब्ध निधीतून हे भव्य स्मारक उभारले जाणार असल्याने या स्मारकास राज्यसराकरकडूनही अधिकचा निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले.
आज स्मारक उभारण्याची संकल्पना मंत्री राधाकृष्ण् विखे पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी संगमनेरला प्रथमत: प्राधान्य दिले. याबाबतचा पाठपुरावाही त्यांनी व्यक्तीगतरित्या लक्ष घालून सुरु केला. दोन दिवसांपूर्वी संगमनेरच्या शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांची मुंबईत भेटही घेतली. मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून जागेच्या निर्णयाबाबत लवकर निर्णय करावा, अशी विनंती केली होती.
त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबतचा निर्णय होवू शकला. परंतू स्मारक उभारणीबाबतचे खोटे श्रेय घेण्यासाठी पुढे आलेले नेते ४० वर्षे मात्र छत्रपतींचे स्मारक उभारु का शकले नाहीत याचे उत्तरही त्यांनी दिले पाहिजे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन पालकमंत्री ना. विखे पाटील यांनीच दिले आहे. त्यानंतर जागे झालेल्या स्थानिक नेत्यांनी याबाबतची सुरु केलेली चर्चा केविलवाणी आहे.
स्मारकाच्या कामास निधी कमी पडू देणार नाही - ना. विखे पाटील
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रातिनिधीक स्वरुपात राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे स्मारक उभारले जाणार आहे. श्रीरामपूर येथील स्मारकाच्या कामाचे भूमीपुजनही संपन्न झाले असून, संगमनेर स्मारकही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहिल. या स्मारकाच्या कामास कोणताही निधी कमी पडणार नाही. स्मारक पुर्णत्वास नेणे हेच आपले उद्दिष्ट आहे.