दंडकारण्य अभियानास ६ जुलैपासून प्रारंभ - डॉ. सुधीर तांबे
◻️ प्रत्येक नागरिकाला यात अभियानात सहभाग नोंदवण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी रस्त्यांच्या दुतर्फा, गावोगावी, मोकळ्या जागेत, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून या हरितसृष्टी निर्माण करणाऱ्या अभियानाचा यावर्षीचा प्रारंभ सहा जुलै पासून करण्यात येणार असून या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आयोजित १८ व्या दंडकारण्य अभियान नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, प्रा बाबा खरात, दत्तात्रय चासकर, बाबुराव गवांदे, दशरथ वर्पे, प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, डॉ दीनानाथ पाटील, मुख्याध्यापक संजय लहारे, श्रीराम कुऱ्हे, नगरपालिकेचे प्रल्हाद देवरे, रोहिणीताई गुंजाळ, प्रकाश कोटकर, आदींसह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या या अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद झाली असून यामुळे संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उघडी बोडकी डोंगर हिरवीगार दिसू लागली आहेत.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी प्रत्येक गावातील मोकळ्या जागेत रस्त्यांच्या दुतर्फा कऱ्हे घाट, चंदनापुरी घाट व कोंची घाट या ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात येणार आहे तसेच गावोगावी करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांवरती देण्यात येणार आहे. कोरोना संकट आपण सर्वांनी अनुभवले आहे ऑक्सिजनचे महत्त्व अनन्यसाधारण असून ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वांनी यावर्षीच्या दंडकारण्य अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, यामध्ये विद्यार्थी व महिलांचा सहभाग महत्त्वाचा असून महिलांनी आपल्या घराच्या परसबागेत वृक्षारोपण करावे. आवळा, कढीपत्ता, लिंब, जांभूळ, आंबा यासारखी विविध वृक्षांची रोपण करून त्याचे संगोपन करावे.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, आरोग्याच्या दृष्टीने पर्यावरण संवर्धनी अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक व्यक्तीने दोन झाडांचे रोपण करून त्याचे संगोपन करावे. विद्यार्थ्यांनाही एक मूल एक झाड याप्रमाणे वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी केले.
कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी शासनाच्या वृक्षारोपण व संवर्धनाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी अनिल थोरात, सतीश गुंजाळ, नामदेव गायकवाड, दंडकारण्य अभियानाचे बाळासाहेब सावंत, बाळासाहेब फापाळे, वनविभागाचे सचिन लोंढे, एच. डी. केदार, एम. एस. खेमनर आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी हजर होते.