भारत ज्वालामुखीच्या तोंडावर उभा, तरुणाईने विवेक आणि सजगता दाखवावी!
◻️ ३२ व्या युवानिर्माण प्रेरणा शिबिरात पद्मश्री पोपटराव पवार यांचे प्रतिपादन
संगमनेर LIVE (अहमदनगर) | नेपाळ, श्रीलंका आणि आता बांगलादेशमध्ये विद्यार्थी आणि तरुणांनी रस्त्यावर येऊन, आक्रमक प्रतिक्रिया देत राज्यकर्ते बदलले. भारत देखील ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्याचे निरीक्षण पद्मश्री पोपटराव पवार यांनी आज ३२ व्या युवानिर्माण प्रेरणा शिबिरात शिबिरार्थींशी संवाद करताना व्यक्त केले.
पवार पुढे म्हणाले की, श्रीलंका आणि बांगलादेशात भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, गरीबी, पेपर लीक, संधी मिळण्यातील भेदभाव, लोकशाहीच्या सांगाड्यात विकसित झालेली एकाधिकारशाही, विरोध व्यक्त करण्यासाठी सनदशीर मार्ग बंद होणे, अधिकार आणि सत्तेवर सामान्य लोकांचे ठोस नियंत्रण न राहणे या प्रश्नांनी विस्फोट झाला. भारतात अशा मुद्द्यांवरील अस्वस्थतेला जात आणि धर्मांची फोडणी सहजतेने दिली जाते. भारतातील ६५ कोटी तरुणाईने विवेक आणि सजगता दाखविली तरच भारताचा अराजकापासून बचाव होईल, असे पवार म्हणाले.
१० ते १५ ऑगस्ट दरम्यान स्नेहालय संस्थेच्या इसळक (ता. जि. नगर) येथील मानसग्राम प्रकल्पात राज्यस्तरीय निवासी युवा शिबिरास आरंभ झाला. १७ ते ३० वर्ष वयोगटातील २५० निमंत्रित युवा आणि विद्यार्थी यात सहभागी झाले.
शिबिराचे आयोजन स्नेहालय संस्थेचा युवानिर्माण प्रकल्प आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांनी संयुक्तपणे केले.
बालविवाह आणि कुटुंबवंचित बालकांच्या समस्यांवर यंदाच्या ३२ व्या युवा प्रेरणा शिबिरातून महाराष्ट्रव्यापी प्रबोधन आणि संघटन केले जाणार आहे. स्नेहालयाने दोनदा भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रांचे आयोजन करून उभय देशातील नागरी समूहात संवाद वाढविला होता. त्यामुळे शिबिराच्या आरंभी बांगलादेशातील हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांसाठी मौन संवेदना व्यक्त करण्यात आली.
पोपटराव पवार यांनी भारतातील स्फोटक सद्यस्थिती, जलवायू परिवर्तन, आशिया आणि युरेशियातील विविध युद्ध, मूलभूत प्रश्न सोडून भावनिक मुद्द्यांवर केंद्रित झालेले भारताचे राजकारण, राजकीय व्यवस्थेप्रमाणेच समाजाची ढासळलेली नैतिकता या सर्व विषयांवर संवादात परखड भाष्य केले.
स्नेहालयाचे संचालक हनीफ शेख यांनी प्रास्ताविकात युवा निर्माण प्रकल्पाचा आज वरील वाटचालीचा आढावा घेतला. अँड. बागेश्री जरंदीकर यांनी वर्ष २०२७ अखेरपर्यंत महाराष्ट्र बालविवाह मुक्त करण्याची शपथ सर्वाना दिली. उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन स्नेहालयाच्या सचिव डॉ. प्रीती भोम्बे यांनी केले.
उडान चळवळ..
वर्ष २०२० पासून स्नेहालयाचा उडान हा प्रकल्प नगर जिल्ह्यातील बालविवाह रोखून बालवधूंचे पुनर्वसन करतो. अशा सुमारे ४०० प्रकरणात यशस्वी हस्तक्षेप करताना उडान कार्यकर्त्यांना आलेल्या अनुभवांचे सादरीकरण उडान प्रकल्पाच्या संचालिका बागेश्री जरंडीकर, समन्वयक प्रवीण कदम यांनी केले.
सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी सुषमा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘व्हय, मी सावित्रीबाई’, हा एकपात्री नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. अहमदनगर औद्योगिक वसाहती मधील स्नेहालय पुनर्वसन संकुलात सायंकाळी ५ वाजता आयोजिण्यात आलेला हा प्रयोग सर्व नागरिकांसाठी मोफत आणि खुला आहे. शोषित स्त्रियांच्या प्रश्नांपासून स्नेहालय ने ३५ वर्षांपूर्वी आपले काम सुरू केले होते. त्यामुळे या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. विविध ७ भाषांमध्ये आणि युरोप, अमेरिका, चीनसह अनेक देशात ४ हजारांवर प्रयोग याचे झाले.
स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी जागतिक दर्जाचे शिल्पकार भगवान रामपुरे यांची प्रकट मुलाखत आणि प्रात्यक्षिके सादर होईल. कला आणि वर्तमान, या विषयावर रामपुरे संवाद करतील.
शिबिरात श्रमदान, वृक्षारोपण, मानसिक आजारी रुग्णांची सेवा सुश्रुषा शिबिरार्थी करतील. प्रत्येक बालकाला कुटुंब मिळण्याचा अधिकार, बालविवाह या विषयांवर गटचर्चा होईल. मागील पाच वर्षांपासून स्नेहालय फॅमिली बेस केअर, हा उपक्रम राबविते. याद्वारे अनाथ - निराधार आणि बेघर मुलांना संस्थेऐवजी कुटुंब व्यवस्थेत विकसित होण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्न केले जातात. त्याची सविस्तर अनुभूती शिबिरार्थींना दिली जाणार आहे.