गणेशच्या सभासदांचे जिल्हा बँके विरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित
◻️ आंदोलनाच्या इशारा नंतर जिल्हा बँकेचा सकारात्मक प्रतिसाद
◻️ फसवणूक झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा सभासदांचा इशारा
संगमनेर LIVE (राहाता) | राजकिय आकसापोटी कर्ज नाकारले जात असल्याच्या भावनेतुन श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासद, शेतकरी व कामगारांचे जिल्हा बँकेच्या विरोधातील सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी आयोजित केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधिरराव लहारे पाटील व उपाध्यक्ष विजयराव दंडवते पाटील यांनी दिली.
श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ या हंगामाकरिता कर्ज मागणीचा प्रस्ताव जिल्हा सहकारी बँकेकडे पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हा बँकेने राजकिय आकसापोटी नाकारला. त्यामुळे मागील हंगामातही ४० कोटी रुपये कर्ज मंजुर केले होते, ते मात्र शेवटच्या क्षणी नाकारले होत. याही वेळी कारखान्याने प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो नाकारला होता. त्यामुळे गणेश कारखान्याचे सभासद, शेतकरी व कामगार आक्रमक झाले होते. येत्या सोमवारी जिल्हा बँकेच्या राहाता शाखेवर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा सहकारी बँकेने गणेश च्या सभासद, शेतकर्यांच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या २० ऑगस्ट रोजी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मिटींग आयोजित करण्यात आली आहे. त्या मिटींग मध्ये विषय पत्रिकेत गणेश कारखान्याच्या कर्जाबाबत विषय ठेवण्यात आला आहे. तसे बँकेने कळविल्याने तुर्तास १२ ऑगस्ट चे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
मात्र २० ऑगस्टच्या जिल्हा बँकेच्या बैठकीत गणेश कारखान्याच्या कर्जा बाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास व कर्ज वितरीत न केल्यास, फसवणूक झाल्यास २७ ऑगस्ट २०२४ रोजी पुन्हा जिल्हा बँकेच्या राहाता शाखेवर निषेध मोर्चाचे आयोजन केले जाईल, असा इशारा लहारे यांनी दिला आहे.
दरम्यान काल या संदर्भात गणेशनगर येथे संचालक मंडळातील सदस्य व काही सभासद, शेतकरी यांची या संदर्भात बैठक झाली. त्यात बँकेने गणेश च्या कर्जा बाबत सकारात्मक कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या बैठकीला गणेशचे अध्यक्ष सुधिरराव लहारे, उपाध्यक्ष विजयराव दंडवते, माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक अॅड. नारायणराव कार्ले, जेष्ठ नेते डॉ. एकनाथराव गोंदकर, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, गणेशचे संचालक भगवानराव टिळेकर, बाबासाहेब डांगे, गंगाधर डांगे, मुधकर सातव, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, बाळासाहेब चोळके, विष्णुपंत शेळके, आलेश कापसे, माजी संचालक आप्पासाहेब बोठे, भाऊसाहेब चौधरी, चंद्रभान धनवटे, अविनाश दंडवते, सर्जेराव जाधव, बलराज धनवटे, उत्तमराव मते, चंद्रभान गुंजाळ, विक्रम वाघ, श्रीकांत मापारी, राहुल गाढवे, प्रा. एल. एम. डांगे, उत्तमराव घोरपडे यांचेसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.