ना. विखे पाटील रहिमपूर, जोर्वे, कनोली येथील शेतकऱ्यांच्या बांधावर
◻️ पावसामुळे नुकसान झालेल्या शेत मालाचे पंचनामे करण्याच्या सुचना
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात मोठ्या स्वरुपात झालेल्या पावसाने नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करुन पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना नागरीकांना दिलासा दिला. रहिमपूर, जोर्वे, कनोली या गावांमध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीची गांभिर्य लक्षात घेवून अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत. तसेच पाण्याचा फुगवटा येणाऱ्या भागातील प्रवाह सुरळीत करण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
दोन दिवसांपूर्वी जोर्वे, रहिमपूर, कनोली या तिनही गावातील पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणातून सोडलेले पाण्याचा प्रवाह मोठ्या स्वरुपात असल्याने हे पाणी नदीकाठालगतच्या शेतांमध्ये आले. या पाण्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यासर्व गावांतील तसेच नुकसान झालेल्या भागाची पाहाणी ना. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. याप्रसंगी तहसिलदार धिरज मांजरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शाम मिसाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शेतीपिकांची नुकसान झाली असल्याने याचे तातडीने पंचनामे करावेत. हे पंचनामे करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या सुचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात झाडीझुडपे असल्याने पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत. मोऱ्याजवळ झालेले अतिक्रमणही असल्याने या सर्व बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करावी. भविष्याचे धोके लक्षात घेवून याबाबतच्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सुचनाही त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.