आमच्या मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम - ना. राधाकृष्ण विखे पाटील
◻️आ. बाळासाहेब थोरातानी दुसऱ्याच्या मुलाची काळजी न करण्याचा लगावला टोला
संगमनेर LIVE | आमच्या मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम आहोत. याबाबत आम्हाला आ. थोरातांनी शिकविण्याची गरज नाही. तुमच्या घरातील मुलामुलींचा छंद पुरविलेला चालतो. दुसऱ्याच्या मुलाची काळजी का करता असा मिष्कील टोला महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आ. थोरात यांना लगावला.
डॉ.सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे सुतोवाच केल्यानंतर आ.थोरातांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रीयेवर भाष्य करताना मंत्री विखे पाटील यांनी आपण तर सर्व घरदार राजकारणात उतरविलं आहे. भावापासून ते जावयापर्यंत सर्वच कुटुंब राजकारणात उतरवून तुम्ही तुमचे छंद पुर्ण केले असा मिष्कील टोला त्यांनी लगावला.
डॉ. सुजय हे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्या मनात काय विचार आहे तो योग्यच असेल. पण या तालुक्यात निर्माण झालेल्य हुकूमशहाने तालुका पुर्ण उध्वस्त केला आहे. केवळ ठराविक लोकांचा विकास झाल्याने तालुक्याचे काय झाले आहे. हे जनता रोज अनुभवत आहे.
लोकांना आता नवीन चेहरा हवा आहे आणि तीच भावना लोकांनी आजच्या मेळाव्यातून व्यक्त केली आहे. लोकभावनेचा आदर करायचा हीच माझी भूमिका आहे. याबाबत पक्ष श्रेष्ठींना कळवून योग्यतो निर्णय ते करतील अशा सुचक शब्दात मंत्री विखे पाटील यांनी एकप्रकारे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी बाबत पत्रकरांशी बोलताना भाष्य केले आहे.